राज्यात कोरोना संकटात महाजॉब्स पोर्टल सुरु

 शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्या मागणीचे फलित

 यवतमाळ,

कोरोना संकटात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या महाजॉब्स पोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. विशेष म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनीच उद्योगाशी संबंधित स्वतंत्र पोर्टल सुरू करण्याची मागणी मे महिन्यात केली होती. आता हे पोर्टल सुरू झाल्यामुळे कोरोना संकटकाळात स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने बेरोजगार तरुणांनी या पोर्टलचे स्वागत केले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ केली होती. या दरम्यान मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर महाराष्ट्र सोडून आपल्या गावाकडे निघून गेले. सरकारने बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरी परप्रांतीय कामगार नसल्यामुळे राज्यातील उद्योगधंदे मोडकळीस आले आहे. दरम्यान याच संधीचा फायदा स्थानिक बेरोजगारांना होण्याची शक्यता असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी 19 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई व वनमंत्री संजय राठोड यांना पत्र देऊन लॉकडाऊननंतर सुरू होणाऱ्या उद्योगांकरिता मनुष्यबळ मिळविण्यासाठी शासनातर्फे संकेतस्थळ सुरू करण्याची मागणी एका पत्राव्दारे केली होती. या विषयाबाबत राज्यात असलेली निकड लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने उद्योग मंत्रालयाला अशा पद्धतीचे वेबपोर्टल सुरू करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान आता या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. हे वेबपोर्टल पुढे उद्योगधंदे व कुशल, अर्धकुशल व अकुशल बेरोजगारांमधील दरी कमी करण्यासाठी प्रमुख माध्यम ठरणार आहे.

उद्योगांसाठी ठरेल संजीवनी

राज्यात सुरू झालेले वेबपोर्टल उद्योगांसाठी संजीवनी ठरणार आहे. परप्रांतीय मजूर, कामगार निघून गेल्याने नेमके कुशल, अर्धकुशल तसेच अकुशल मनुष्यबळ शोधण्याची मोठी डोकेदुखी उद्योगपतींना करावी लागणार होती. यवतमाळच्या पराग पिंगळे यांच्या सामाजिक जाणीवेतून तसेच कुशल बुध्दीमत्तेतून एक सुपिक आयडीया समोर आली आणि त्यांनी दिलेली सूचना प्रत्यक्ष कृतीत उतरल्याने त्याचा फायदा आता बेरोजगार तरुण तसेच उद्योगपतींना होणार आहे.

 बेरोजगारांना होईल फायदा

परप्रांतीय मजूर तसेच कामगार निघून गेल्याने स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मी राज्यातील बेरोजगार तरुणांना तसेच उद्योजकांना माहिती होण्याकरिता संकेतस्थळ तसेच अॅप सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उद्योगाशी संबंधित स्वतंत्र वेबपोर्टल सुरू झाल्याने राज्यातील स्थानिक बेरोजगारांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्य सरकारचे स्वागत केले आहे.