तुकाराम मुंढेंना महापौरांचे पत्र; तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

नागपूर,  

नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे परत एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे. महासभेतील स्थगन प्रस्तावावरील चर्चेनंतर महापौरांनी दिलेल्या निर्देशाचे अद्यापही पालन करण्यात आले नाही. प्रशासनाने कुठली कारवाई केल्याची माहिती महापौरांकडे आली नाही.  महापौरांनी महासभेतील निर्णयावर नाराजी व्यक्त करीत दिलेल्या निर्देशाला सभागृहाच्या पटलावर सादर करण्यासाठी तीन दिवसात माहिती सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत.महासभेत स्थगन प्रस्तावावरील चर्चा चार दिवस चालली. यात महत्वाचे ९ निर्णय दिले होते. याबाबत आयुक्तांनी ६ जुलैपर्यंत आपले स्पष्टीकरण महापौरांकडे सादर करणे आदी निर्णय २६ जूनला दिले होते. मात्र, या सर्व निर्णयाची माहिती महापौरांकडे आली नाही. या निदेंशास १९ दिवसाचा काळ लोटला. कुठलाच अहवाल, स्पष्टीकरण वा माहिती आयुक्तांमार्फत आली नाही.वा कुठली कारवाईचीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पुढील तीन दिवसात ही माहिती आपणास सादर करावी असे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले आहेत.