शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ निकाली काढण्याचे दिले आश्वासन

गोंदिया,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मागण्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी चर्चेदरम्यान, एक वर्षापासून प्रलंबित निवड श्रेणी व चटोपाध्यायची प्रकरणे निकाली काढणे यासंदर्भात चर्चा केली असता शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभाग या प्रश्नासंदर्भात गंभीर असून लवकरच मूल्यमापन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये हे मुद्दे निकाली काढले जातील, असे सांगितले. डीसीपीएस/जीपीएफ कपातीचा आजपर्यंतचा हिशेब देण्यासंदर्भात चर्चा केली असता मार्च 2014 पर्यंतचा डीसीपीएस बांधवांचा हिशेब झालेला असून पावत्या स्वाक्षरीकरिता मुलेवीअकडे ठेवण्यात येणार असल्याचे सबंधित लिपिकाने सांगितले. उर्वरीत डीसीपीएस तसेच जीपीएफ शालार्थ प्रणालीद्वारे कपात झालेल्या पैशांचा हिशेबा संदर्भात चर्चा केली असता यावर शिक्षण विभाग गांभीर्यपूर्वक काम करीत असून माहेवार चालन व शेड्युल वित्त विभागाला सादर करण्यात येईल, गणवेश निधी तत्काळ मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग दहा ते पंधरा दिवसात मुख्याध्यापकांच्या खात्यावर सदर निधी वर्ग करण्यात येईल, सेवानिवृत्ती प्रकरणे वित्त विभागाला सादर करण्यात येईल, असे सांगितले. वेतन दिरंगाई संदर्भातील प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याकरिता जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करून थेट शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा परिषदमधूनच वेतन जमा करण्याची मागणी केली असता यावर सर्व शिक्षकांची खाते एसजीएसपी अंतर्गत एसबीआय शाखेत उघडून वित्त व कोषागार विभागाशी चर्चा करून सीएमपी वेतन प्रणाली राबविण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले. उच्च परीक्षा परवानगी, संगणक सूट, स्थायी प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात चर्चा केली असता यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित लिपिकाला नस्ती सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद हायस्कूलमधील रिक्त पदे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांची रिक्त पदे, पदवीधर विषय शिक्षकांची रिक्त पदे लवकरात-लवकर पदोन्नतीने भरण्यासंदर्भात चर्चा केली असता शिक्षणाधिकाऱ्यांनी पद्वीधर विषय शिक्षक विज्ञान विषयाची माहिती संदर्भात पत्रक काढण्यात येईल तसेच उर्वरित पदोन्नतीची सर्व पदे भरण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विषय शिक्षक बांधवांना सरसकट वेतनश्रेणी लावण्यास संदर्भात चर्चा केली असता शासन नियमानुसार सर्व पात्र शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून वेतन श्रेणी देण्यात येईल व यावरील अंतिम आदेश लवकरच निर्गमित करण्यात येईल, असे सांगितले. 14 वित्त आयोगमधून शाळेची विद्युत बिल ग्रामपंचायतद्वारे भरण्यात संदर्भातील नस्ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक समितीचे किशोर डोंगरवार, संदीप तिडके, जी.एम. बैस, सुधीर खोब्रागडे, प्रफुल्ल भोयर उपस्थित होते.