चीन, युरोप, आफ्रिकेतून दूध निर्यात बंद

 

  • 52 लाख लीटर अतिरिक्त दूध निर्मिती
  • 21 जुलैला स्वाभिमानीचे आंदोलन

बुलडाणा,

राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लीटर आहे. 52 लाख लीटर उत्पादन अतिरिक्त होत आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रुपयांवरून 180 रुपयांवर आलेला आहे. यामुळे दूध उत्पादक संकटात सापडले असून 21 जुलै रोजी स्वाभिमानी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाली आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकार 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेत आहे. बटरचा दर 340 रुपयांवरून 220 रुपये झाल्याने याचा परिणाम दूध खरेदीवर झाला आहे. अनेक संस्था 17 ते 20 रुपये लिटरने दुधाची खरेदी करीत आहेत. दुधाचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रीम, मॉल, विवाह सोहळे बंद आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यात पॅकिंग दुधात 19 लाख लीटरने घट झालेली आहे. 2018 मध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लीटर 5 रुपये अनुदान जाहीर करून 700 कोटी रुपये अनुदान दूध

उत्पादकांना दिले होते. याचा फायदा राज्यातील 46 लाख दूध उत्पादकांना झाला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारने आता प्रतिलीटर दुधास 5 रुपयांचे अनुदान द्यावे, केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, दूध पावडर करीता प्रतिकिलो 50 रुपए अनुदान देण्यात यावे, दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

अनुदान देण्याची मागणी

दुधाला प्रतिलीटर 5 रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 21 जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी
लाक्षणिक दूधबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शेतकरी नेते तुपकर यांनी केले आहे.