कंटेन्मेंट झोनमधील एटीएम फोडून नऊ लाख पळविले

 भंडारा शहरातील घटना

भंडारा,

येथील राष्ट्रीय महामार्गालगत कंटेनमेंट झोनमधील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख 40 हजार रुपये पळविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडली. कंटेनमेंट झोनमध्ये चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. चोरट्यांच्या शोधासाठी शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे.

भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पटवारी भवनच्या समोर इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सकाळी एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलीसांना आणि स्टेट बँकेला देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम पळविल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे सदर एटीएम कंटेनमेंट झोनमध्ये असून या परिसरात पोलीसांचा पहाराही असतो. अशा स्थितीत अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील एटीएम फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एटीएम फोडणारे मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम मध्ये शिरले असावे, असा कयास पोलीसांना आहे. लॉकडाऊनच्या काळात सदर चोरटे कोणत्या वाहनाने आले याचाही शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि भंडारा शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या परिसरात कुठेही सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरांचा शोध घेणे कठीण झाले आहे. तसेच एटीएम मधील कॅमेऱ्यातही पुरेसे फुटेज आल्याचे दिसत नाही. ही घटना केव्हा घडली, याचाही थांगपत्ता लागला नाही.

पोलीसांची दोन पथके तयार

कंटेनमेंट झोनमध्ये चोरी झाल्याने पोलीस खळबळून जागे झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात दोन पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे आणि भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे या घटनेचा शोध घेत अआहेत.

जिल्ह्यात एटीएम फोडणारी टोळी सक्रिय

भंडारा जिल्ह्यात अलीकडे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती लागले नव्हते. कोंढा, जवाहरनगर येथेही एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या. तुमसर शहरातही चोरट्यांनी एटीएम फोडले होते. मात्र अद्यापपर्यंत चोरटे पोलीसांच्या हाती लागले नाही. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून पैसे पळविणारी ही टोळी आंतरराज्यीय असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. भंडारा शहरातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे. बहुतांश एटीएम मध्ये चौकीदारही नसतो. तेथील कॅमेरेही अनेकदा बंद असतात. एखादी घटना घडल्यानंतच त्यांची चर्चा होते.