तीन मजली इमारत कोसळली

अमरावती,

१९६० मध्ये बांधण्यात आलेली तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.  शहरातील जयस्तंभ चौक परिसरातल्या अग्रेसन भवन समोर गांधी व्यापारी संकुल नावाची ही तीन मजली इमारत होती. आज पहाटेच्या सुमारास ही इमारत अचानक जमीनदोस्त झाली. इमारतीच्या बाहेर असणारे दोन सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाले आहे. 

गेल्या २ दिवसापासून शहरात पाऊस सुरू असल्याने ही इमारत कोसळल्याचे सांगितले जात आहे. या इमारतीचे बांधकाम 1960 मध्ये झाले आहे. या इमारतीत एकूण 12 दुकाने सुरू होती. बुधवारी मुसळधार पाऊस कोसळल्यावर रात्रभर रिमझिम पाऊस बरसत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास गांधी व्यापारी संकुल इमारत अचानक कोसळली. या परिसरातच असणाऱ्या शहर कोतवाली पोलिसांना माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. इमारत कोसळल्याने जखमी झालेल्या चौकीदारस उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.