ऑनलाईन शिक्षणाने वाढविली पालकांची डोकेदुखी

वडनेर,

मोबाईलचा अती वापर करणे हे व्यसन आहे. ते वापरल्याने मुले वाईट मार्गाने जातात. मुलांना मोबाईलचे व्यसन लागत असल्याने मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे, असे  शाळा महाविद्यालयातून सांगण्यात येत होते. आता लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे.  यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

विद्यार्थी मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत आहे. त्यामुळे पाल्यांना मोबाईल वापराचे  व्यसन तर लागणार नाही ना, असा प्रश्न पालकांना पडला आहे. पाल्याला व्हॉट्सअपपासून दूर ठेवले नाही तर, ते वाईट मार्गाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन ऑनलाईन शिक्षण देण्यापेक्षा पाठ्यपुस्तके विकत घेऊन शिक्षण द्यावे. पाठ्यपुस्तकातील अभ्यासकर्म पूर्ण करून घ्यावा. 22 मार्चपासून सुरू झालेली कोरोना महामारी संपताना दिसत नाही. 4 महिने होऊनही कोरोनाचे संक्रमण कमी होताना दिसत नाही. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान  होत आहे. यातच ऑनलाईन शिक्षण मोबाईलवर देण्यात येत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होताना दिसत आहे. याला जबाबदार कोण? शाळा की सरकार, असा प्रश्न निर्माण  झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण बंद करून विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकातून अभ्यास करायला लावावा, अशी मागणी होत आहे.