शुल्क वसुलीसाठी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा

शासन निर्देशांना तिलांजली : प्रवेशप्रक्रियेचा घाट

गोंदिया,

सरकारने पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षण प्रणालीत समावेस करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही शहरातील पूर्व प्राथमिक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा आजमावत पालकांकडून मोठ्या रकमांचे शुल्क वसूल करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यासाठी पालकांना त्यांचे पालन प्रवेश निश्चित करण्यासाठी गळ घातली जात असून गेल्या वर्षापेक्षा वाढीव शुल्काची मागणी केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

देशभरातील शाळा, महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. परंतु, तरीही अगदी नर्सरी सोबतच ज्युनिअर केजी व सिनिअर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. गेल्या वर्षी पालकांसोबतच संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हाट्सअॅपच्या माध्यमातून लिंक शेअर करून या शाळांनी विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात केली. यात मागील वर्षांत विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमासह विविध प्रकारच्या कार्यानुभवांच्या प्रात्यक्षिकांची उजळणीही करून घेतानाच नवीन वर्षात प्रवेशासाठी पालकांना गळ घातली जात आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी एकीकडे पालकांना विद्यार्थ्यांसमवेत बसून वेळ घालवावा लागतो. त्यासाठी स्मार्टफोन व इंटरनेटचा खर्चही करावा लागतो. तर दुसरीकडे शाळांचा ऑनलाईन शिक्षणामुळे इमारतीचा देखभाल, दुरुस्ती खर्च, वाहतूक खर्च, सुरक्षा खर्च यामध्ये कपात झाली आहे, असे असतानाही शाळांकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढीव शुल्काची मागणी केली जात आहे. त्यामुळे पालकांकडून शाळेच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत आहे. परंतु इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला पाल्य मागे पडू नये, यासाठी पालकांचे प्रयत्न असल्याचे कोरोनाच्या या संकटात पालकांचीही कोंडी झाली आहे.

पुस्तके खरेदी करण्यासाठीही तगादा

शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी कोरोना संकटामुळे अद्याप शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. असे असले तरी शाळा प्रशासनाकडून आता शाळा शुल्क आणि पुस्तके खरेदी करण्याकरिता पालकांना फोन येत आहेत. वारंवार येत असलेल्या फोनमुळे पालक देखील त्रस्त झाले आहेत. तक्रार तरी कुणाकडे करावी, असा सवाल त्यांना सतावत आहे.

प्रशासनाचेही दुर्लक्ष

शाळांनी पालकांकडे शुल्काकरिता तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. अनेक शाळा शुल्क वसूल करण्याकरिता तगादा लावत आहेत. त्यामुळे शहरतील काही पक्ष आणि संघटनांनी शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र असे असताना देखील शाळा पालकांकडे शुल्काकरिता तगादा लावत आहेत. या प्रकाराकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले आहे.