people salekasa gondia found baby leopard in farm

शेतात मांजरासारखा दिसणारा प्राणी आढळून आला. याची माहिती नागरिकांनी सालेकसा वनविभागाला दिली. या माहितीवरून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केल्यावर सर्वांनाच धक्का बसला.

सालेकसा : सालेकसा वनपरिक्षेत्राअंतर्गत बिजेपार सहवनक्षेत्रातील कुलरभट्टी भाग – १ या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी कुलरभट्टी येथील काही नागरिकांना जंगला जवळच्या शेतात मांजरासारखा दिसणारा प्राणी दृष्टीस पडला. याची माहिती नागरिकांनी सालेकसा वनविभागाला दिली. या माहितीवरून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यावर सर्वांनाच धक्का बसला.

पाहणी दरम्यान अंदाजे दोन ते तीन महिन्याचा बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. वनविभागाने त्याची सुखरूप सुटका केली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि :श्‍वास सोडला. हा बिबट्या मंगळवारी (ता. १४) सायंकाळच्या सुमारास दिसला होता. त्यानंतर तपासणी केली असता, या बिबिट्याच्या शरीरावर कुठलीही जखम अथवा इजा झालेली नाही. दरम्यान, या बिबट्याला गावकऱ्यांच्या मदतीने गावालगत असलेल्या जंगलात त्याच्या आईच्या जवळ सोडण्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठरवले.

त्यानंतर, गावालगत बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात बांबूपासून तयार केलेल्या पिंजऱ्यात त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. तथापि, दोन-तीन तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे १ च्या सुमारास मादा बिबट आली आणि तिने या बिबट्याला उचलून नेले. त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. ही कार्यवाही वनपरिक्षेत्राधिकारी अभिजित इलमकर यांच्या नेतृत्वात वनरक्षक बघेले, बोरकर, पटले व अन्य कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केली.

जंगलव्याप्त भागांत गस्त वाढविणे गरजेचे

सालेकसा तालुक्‍यातील बहुतांश गावे ही जंगलव्याप्त भागांत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागून आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा गावात व शेतात वावर वाढला आहे. अशावेळी शिकाऱ्यांची टोळी सक्रिय होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी या विभागातून होत आहे.