कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील पुलाची दयनीय अवस्था

  • पुलावरुन ये-जा करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण
  • आमदार महोदयांनी या मार्गावर नविन पुल मंजूर करुन देण्याची नागरिकांची मागणी

गोंदिया. सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील पुलाची दयनीय अवस्था झाली असून या पुलावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे. पुल जर्जर झालेल्या असुन कधीही भुईसपाट होऊ शकते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या पुलाला दोन-तीनदा भगदाड पडले होते, याबाबत वर्तमानपत्रात बातमी दिल्यानंतर संबंधित विभागाने याची दोन-तीन वेळा डागडुजी करून खड्डे सिमेंट काॅक्रीटने बुजविले होते. मात्र या पुलाचे नविन बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी लक्ष घालून सदर  मार्गावरील नाल्यावर नविन पुल मंजूर करुन नव्याने बांधकाम करण्यात यावे. अशी या मार्गावरून प्रवास करणारे थाडेझरी, बोळुंदा कोसमतोंडी येथील गावकऱ्यांची आमदार महोदयांकडुन अपेक्षा आहे.

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या थाडेझरी व बोळुंदा या गावाला जाणारा हा एकमेव मार्ग आहे. याच मार्गावरून कोसमतोंडी येथील शेतकरी बोळुंदा शेतशिविरात जातात.कोसमतोंडी येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत बोळुंदा येथे आहेत. या मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन, आमदार, खासदार व संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करित आहेत. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात ऊसाची वाहतूक करित असतांना ऊस भरलेला ट्रक्टर पुलावरून जात असतांनी पुलाला मोठे भगदाड पडून ट्रक्टर पलटला होता. त्यावेळेस सुद्धा संबंधित विभागाने पुलाची थातुरमातुर डागडुजी करून खड्डा बुजविला होता. मात्र या पुलाचे नविन बांधकामाकडे दुर्लक्ष केले.सदर पुल हा जीर्ण झालेला असून या पुलावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे होय. पुलाची दयनीय अवस्था झाली असून पुल कधीही भुईसपाट होऊ शकतो. असे झाल्यास या मार्गावरील रहदारी बंद होईल. पुलावरून ट्रक्टर जात असतांनी पुल हलतो. या पुलावरून ये-जा करणे जिवघेणे झाले आहे. या पुलावर एखादमोठी दुर्घटना होण्याची वाट संबंधित विभाग पाहत आहे काय असे या गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. या पुलावर लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठी दुर्घटना होऊन मरणाची तर वाट पाहत नाही ना? अशी जनमानसात चर्चा आहे. या पुलाचे बांधकामांकडे या क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी तात्काळ लक्ष घालून पुलाचे बांधकाम करण्याची मागणी या गावातील नागरिक करित आहेत.