राजगृहाची तोडफोड करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवा

सर्व आंबेडकरी चळवळतील सामाजिक व राजकीय संघटनांची मागणी

गोंदिया,

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी सर्व आंबेडकरी चळवळतील सामाजिक व राजनैतिक संघटनेने केली आहे. या संबंधीचे निवेदन 10 जुलै रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवास्थानी म्हणजे राजगृहावर 7 जुलै रोजी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. तसेच घरांच्या काचावरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेवर अत्याचार केले जात आहे. पिंपरी चिचवड येथील हत्याकांड, काटोल येथील अरविंद बन्सोड हत्याकांड अशा अनेक घटना घडत आहेत. या घटनेसंबंधी आंबेडकरी कुटुंबीयांकडून सीसीटीव्ही फुटेच पोलिसांना देण्यात आले. या घटनेचा निषेधार्थ सदर प्रकरणातील त्या मानसिक विकृत आरोपींना लवकरात-लवकर अटक करून तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रकारचे कृत्य होणार नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाला कायमचा संरक्षण देण्यात यावे, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. सदर प्रकरणात आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व आंबेडकरी चळवळतील सामाजिक व राजनैतिक संघटनेने केली आहे. शिष्टमंडळात धर्मेंद्र बोरकर, उत्तम मेश्राम, प्रविण कांबळे, सौरभ सावनकर, ज्योसना मेश्राम, कुणाल मेश्राम, सचिन गणवीर, शुभम नागदवने, सुशील रंगारी, संदीप मेश्राम, दिशांत उके, प्रविण बौद्ध, रंजित बारलिंगे, प्रकाश डोंगरवार, संजय चौरे, शरद बोरकर, दलेश नागदेवे, भुषण गेडाम, कशिश बागडे आदी उपस्थित होते.