पतसंस्थांची कोट्यवधींची वसुली थांबली

गोंदिया,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसुली व दररोज होणारे रिकरिंग कलेक्शन थांबल्याने जिल्ह्यातील पतसंस्था एजंटावर उपासमारीची वेळ आली आहे. पतसंस्थाची वसुली थांबल्यामुळे पतसंस्थांनाही आर्थिक चणचण भासू लागली असून, काही पतसंस्थांना लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेक व्यावसायिक किंवा शेतकरी पतसंस्थांकडून कर्ज उचलतात. कागदपत्रे बघून पतसंस्था लाखो रूपयांचे कर्ज पुरवठा करतात. एजंटामार्फत दररोज पैशांचे कलेक्शन करून पतसंस्था कर्ज वसुली करतात. यातूचनच एजंटला कमिशन दिले जाते. याशिवाय कर्ज, ठेवी, दामदुप्पट योजनाही पतसंस्थेतर्फे सभासदांना दिल्या जातात. कोरोनामुळे व्यवसायात मंदी आहे. त्यामुळे दररोज होणारे कलेक्शन थांबले आहे. यामुळे एजंटासह पतसंस्थेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून दररोज होणारे कलेक्शन थांबले आहे. त्यामुळे व्यावसायिक कर्ज मागणी मंदावली आहे. शिवाय ठेवीदारांचे पैसेही देण्यासाठी पतसंस्थाकडे पैसे शिल्लक नाहीत. पतसंस्था सुस्थितीत येण्यासाठी काही कालावधी जाणार असल्याने भाडे, कर्मचारी पगार, वीज बिल, कर्जदारांकडून थांबलेली वसुली, ठेवीदारांचे देणी यासाठी सरकारने पतसंस्थांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज तालुक्यातील पतसंस्था चालक व्यक्त करू लागले आहेत.

एजंटवर उपासमारीची वेळ

पतसंस्थेमार्फत अनेक एजंट बचत खाते चालवतात. दुकानदारांना दिलेले कर्जही दररोजच्या कलेक्शनमधून वसूल करतात. यामधून पतसंस्था त्यांना कमिशन देत असते. आता पतसंस्थेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी विविध पतसंस्थातील एजंटावर उपासमारीची वेळ आली आहे.