अंजनगावात बोगस खत विक्री

प्रतिबंधित कंपनीचे खत विकल्याची तक्रार

अंजनगाव सुर्जी : सध्या संपूर्ण देशात शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी खते, औषधे देऊन भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्याच्या या स्वप्नांचा फायदा घेऊन बोगस खतविक्री करून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रकार तालुक्यात सुरू आहे. विनीत डोंगरदिवे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीतून अंजनगाव सुर्जीत बोगस खत विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. 

पुणे येथील कराडस्थित मे. सव्हियो बायो ऑरगॅनिक्स अँड फर्टिलायझर्स प्रा. लि. या खत निर्मिती करणाऱ्या कंपनीवर शेतकऱ्यांना 18-18-10 ऐवजी जिप्सपचा पुरवठा केला तसेच बेकायदेशीर कृत्य करून त्यांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून कंपनीचे परवाना पत्र निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत खतनिर्मिती व विक्री करण्यास पुणे येथील कृषी आयुक्तालयाने बंदी घातली आहे. असे असतानाही याच कंपनीचे 18-18-10 मिश्र खत तालुक्यातील पिंपळगव्हाण येथील मातोश्री कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीर विक्री होत असल्याची तक्रार विनीत डोंगरदिवे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर प्रतिबंधित खताची निर्मिती आणि विक्री केली जात आहे, म्हणून मे. सवियो या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी विनीत डोंगरदिवेंनी तक्रारीतून केली आहे.