हनी ट्रॅप प्रकरणी ‘तू तू मैं मैं’

नागपूर,

सर्वच मोठ्या पक्षाच्या बड्या नेत्यांसोबत जवळीक असलेल्या साहिल सय्यदच्या (Sahil Sayyad) वादग्रस्त ‘हनी ट्रॅप’ संभाषणाने शुक्रवारी राजकीय वळण घेतले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू तू मैं मैं सुरु आहे. साहिलची भाजपच्या नेत्यांसोबत भागीदारी असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. तर, भागीदारीचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी केली.

भाजपच्या नेत्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याची योजना आखणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकाराची चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. त्या पत्रास गृहमंत्र्यांनी शुक्रवारी उत्तर दिले. ‘वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण करणारा साहिल सय्यद हा आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख आदी नेत्यांच्या तो अतिशय जवळचा आहे. त्यांचा तो व्यावसायिक भागीदार असल्याचे कळते. तोच आता आपल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा आपल्या पक्षातील अंतर्गत राजकीय वादाचा प्रश्न दिसतो’, असा पलटवार देशमुख यांनी केला. साहिलने न्यायव्यवस्था मॅनेज करण्याबाबत केलेल्या वक्तव्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुख यांचे पत्र व्हायरल होताच, चंद्रशेखर बावनकुळे व सुधाकर देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. ‘अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे साहिलसोबत आमची व्यावसायिक भागिदारी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी खोटे पत्र आपणास पाठवले आहे. व्यावसायिक भागिदारीचे पुरावे त्यांनी द्यावे अन्यथा आपले विधान मागे घेऊन माफी मागावी’, असे आव्हान बावनकुळे यांनी केले. या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास आणखी नवे चेहरे समोर येण्याची शक्यता बळावली आहे.