आमगावमध्ये नागरिकांचा स्वयंस्फूर्त बंद

कोरोना प्रादुर्भाव बघता व्यावसायिक व नागरिकांच्या पुढाकाराने आमगाव शहर बंदला उत्तम प्रतिसाद

आमगाव,

जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.  तसेच तालुक्यात नुकतेच दोन कोरोना रुग्ण मिळाले त्या अनुषंगाने शहरातील व्यावसायिक व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी संपूर्ण बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण शहर बंद पाळण्यात आला.  एंकदरीत शहरवासीयांनी संसर्ग थांबविण्यासाठी या बंदला जनता कर्फ्यू समजुन सहकार्य करावे, असे आव्हान व्यावसायिक व पालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच केले होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग कसा थांबविता येईल, यासाठी नगर परिषदेच्या सभागृहात प्रशासकीय अधिकारी तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी.एस.भोयर यांनी सभा आयोजित केली होती. या सभेत आमगाव तालुक्यातील व्यावसायिकांना बोलाविण्यात आले होते. सभेत तहसीलदार भोयर उपस्थित होते. या सभेत व्यावसायिक व पालिक प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत प्रत्येक शुक्रवारला भाजीपाला बाजार बंद असतो या अनुसंगाने इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक शुक्रवारी हा बंद पाळण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शहरवासीयांनी या बंद ला  उत्तम प्रतिसाद दिला. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली , काही शाळा महाविद्यालयानी सुध्दा सहभाग नोंदवुन बंद पाळला. फक्त शासकीय कार्यालये, बँका सुरू होत्या.  विशेष म्हणजे, या बंद दरम्यान औषधी दुकाने, व दवाखाने  सुरू ठेवण्यात आली. व्यावसायिकांनी हा निर्णय घेऊन कोरोना संसर्ग कसा थांबविता येईल या करिता चांगले उपक्रम राबविले  असे नागरिकांचे मत होते.