दोन वर्षाच्या चिमुकलीचे कुत्र्यांनी तोडले लचके!

अकोट. शेतात झाडाखाली बसलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीच्या तोंडाचे कुत्र्यांनी अचानक हल्ला करून लचके तोडल्याची घटना अकोट तालुक्यातील पिलकवाडी शेतशिवारात घडली. या घटनेने घाबरलेल्या चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून धाव घेत तिच्या आईने तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. सदर चिमुकलीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.

शुभेच्छा निलेश मोरोदे असे या चिमुकलीचे नाव असून, नेहमीप्रमाणे तिचे आईवडील तिला शेतावर घेवून गेले होते. शेतात असलेल्या झाडाजवळील एका मंदिरासमोर चिमुकलीला त्यांनी बसवून ठेवले. तेथे ती खेळत असताना त्याठिकाणी आलेल्या कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकलीच्या तोंडावर हल्ला चढविला. कुत्र्यांनी चिमुकलीच्या हनुवटीचे लचके तोडले. भेदरलेल्या चिमुकलीच्या आवाजाने आई धावत आली आणि तिने तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. रक्तबंबाळ अवस्थेत चिमुकलीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. पराग डोईफोडे यांनी तत्काळ त्या चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, चिमुकलीच्या पालकांची परिस्थिती उपचार करण्याजोगी नसल्याचे पाहून तिच्या प्लास्टिक सर्जरीसाठी काही सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आणि त्यांनी लगेच त्यांना जवळपास २५ हजार रुपयांची मदत केली.