आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड  करणाऱ्यास कडक शासन करा -भूषण गायकवाड

 जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे निवेदन

अकोला,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर  अज्ञातांकडून तोडफोड केल्याबद्दल जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गायकवाड व महानगराध्यक्ष आकाश सिरसाट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील मौल्यवान वस्तूसह कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेडकरी अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण असून, राजगृहावरील तोडफोडीने देशातील आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सदरील घटना ही आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाच्या भावना दुखावणारी व अशोभनीय आहे तसेच राजगृहावर झालेली तोडफोड ही केवळ राजगृहाची नव्हे तर समग्र आंबेडकरी चळवळीची तोडफोड असून, या निंदनीय घटनेचा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे सदरील निवेदनात म्हटले आहे. तसेच आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारास तत्काळ अटक करून कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी भूषण गायकवाड यांनी केली आहे.