अंधश्रद्धा : पुन्हा एका बालकाच्या पोटाला दिले चटके

  • जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

अमरावती. मेळघाटमध्ये आणखी एका बाळाच्या पोटावर गरम वस्तूचे चटके दिल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मेळघाटात गेल्या दोन महिन्यात घडलेली ही तिसरी घटना आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि फोफावलेली अंधश्रद्धा यामुळे असे प्रकार घडत असल्याचे पाहायला मिळते. या जखमी बालकावर अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावातील दिवेश अखंडे या चार वर्षांच्या बालकाचे मागील दोन दिवसांपासून पोट फुगले होते. यावेळी या मुलाला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्या पालकांनी पोटावर गरम सळईचे चटके दिले. त्यामुळे मुलाची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर त्याला उपचारासाठी अचलपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक  उपचारानंतर त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वी घडली होती अशीच घटना
मेळघाटातील आदिवासी बालकांना मोठ्या प्रमाणावर पोटफुगी या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारावर उपचारासाठी आरोग्य विभागाच्या सोईसुविधा असताना देखील बहुतांश आदिवासी हे या रोगावर उपचार म्हणून लहान बालकांच्या पोटावर गरम वस्तूने चटके देतात. असाच धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर शासनाच्यावतीने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यात आला. परंतु या घटना थांबायचे नाव घेत नाही. दरम्यान, मेळघाटसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि फोफावलेली अंधश्रद्धा यामुळे दिवसेंदिवस अशा धक्कादायक घटना समोर येत आहेत.