फसवणूक प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

आकोट. युवकाला नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून त्याची २९ लाख ३५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. 

शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल एका प्रकरणात फिर्यादी वेदांत रामकुमार जयस्वाल या सुशिक्षित बेरोजगार युवकाची आरोपी सुधाकर उत्तमराव ठाकरे रा. मोर्शी जि. अमरावती याने फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादीला ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २९ लाख ३५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांनी युक्तिवाद करताना महत्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपींनी सदर प्रकरणा व्यतिरिक्त बाळापूर येथील राहुल मदनसिंग ठाकूर यालाला नोकरीचे आमिष दाखवून ९ लाख ५० हजारांनी फसवल्याचा आरोप आहे. त्यामुळे आरोपींनी आणखी किती जणांना अशाप्रकारे फसवले याचा तपास बाकी आहे. तसेच या प्रकरणातील एक आरोपी सागर अढाव याने तपासा दरम्यान माहिती दिली की, सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावतीचे नियुक्ती पत्र तयार केले आहे. त्यामुळे किती बनावट नियुक्ती पत्र बनवून लोकांना फसवले या साठी फरार आरोपीला ताब्यात घेणे आवश्यक आहे. तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी नागपूरचे बनावट नियुक्तीपत्र, आयकार्ड कोठे आणि कोणामार्फत तयार केले या संबंधी फरार आरोपी सुधाकर ठाकरेची कस्टडी आवश्यक आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीचा विषय देशाच्या सुरक्षेशी संबंधीत आहे, ही बाब देखील ॲड. देशमुख यांनी न्यायालयासमोर मांडली. त्यावरुन न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.