जिल्ह्यात सरासरी 336.2 मिमी पाऊस

 शेतकरी सुखावला

भंडारा,

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 336.2 मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यात 463.1 मिमी नोंदविण्यात आला आहे. तर शहापूर मंडळात विक्रमी 628 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावला असून आता रोवणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात 1 जून ते 7 जुलै या कालावधीत 295.7 मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा  7 जुलैपर्यंत जिल्ह्यात 336.2  मिमी म्हणजे सरासरीच्या 114 टक्के पाऊस झाला आहे.

भंडारा तालुक्यात सर्वाधिक 463.1 मिमी,  मोहाडी 298.5 मिमी,  तुमसर 333.5 मिमी,  पवनी 334.9 मिमी,  साकोली 333.2 मिमी, लाखांदूर 287.3 मिमी, लाखनी 403.2 मिमी पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात नोंदविल्या गेला. येथे 628 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल तुमसर तालुक्यातील गर्रा येथे 505.2 मिमी आणि लाखनी तालुक्यातील पोहरा येथे 501 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसात झालेल्या या पावसाने शेतकरी सुखावला आहे. ठप्प पडलेल्या रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतशिवार शेतकऱ्यांनी गजबजले आहे.