बोझापत्रक देण्यास बँकेची टाळाटाळ

  • पीककर्ज देण्यासही टाळाटाळ
  • सुकळी(बाई) च्या बँक ऑफ इंडियातील प्रकार
  • शेतकरी पिक कर्जापासून वंचित

सेलू,
तालुक्यातील सुकळी(बाई) येथील बँक ऑफ इंडियामध्ये पीक कर्ज देण्यास येथील व्यवस्थापक  टाळाटाळ करीत असल्याची ओरड आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतरही बोझापत्रक देण्यास  मनाई करीत असल्याने अनेक शेतकऱ्यांवर पीक कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

शेतक-यांना पीककर्ज देण्यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी मागील आठवड्यात सेलू येथे आढावा बैठक घेऊन बँक व्यवस्थापकाची  चांगलीच कानउघडणी केली. परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नसून अजूनही सुकळी येथील बँकेत पीक कर्जासाठी शेतकऱ्याची अडवणूक करण्यात येत असल्याची ओरड आहे.

कर्ज माफीत आलेले आकोली येथील विठ्ठल जुवारे यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा मुलगा गजानन जुवारे याने वारसान प्रक्रिया केल्यानंतर त्याच्या कर्ज खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली. परंतू या वर्षी नवीन पीक कर्ज देण्यासाठी  येथील बँक व्यवस्थापकाकडून   दिशाभूल करण्यात येत आहे.

तो एक महिन्यापासून पीक कर्जासाठी बँकेच्या येरझाऱ्या घालत आहे
तर आकोली येथील चंद्रशेखर गोमासे यांनी सन 2011 मध्ये या बँकेतून पीककर्ज घेतले होते.ते त्यांनी सन 2014 साली परत केले. त्यावेळी त्यांचे सातबारावर कर्जाचा बोझा चढविण्यात आला होता.या वर्षी त्यांना पिककर्जाची गरज भासल्याने सातबारावरील बोजा कमी करणे आवश्यक आहे. परंतु  बँक व्यवस्थापकाचे मनमर्जी कारभारामुळे  चंद्रशेखर गोमासे  महिन्याभरापासून बँकेच्या घिरट्या घालत आहे. शेतीचा हंगामात  शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशाची नित्तांत गरज असते. अशावेळी बँकेकडून विनाकारण अडवणूक करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे
अशा अट्टेल  बँक व्यवस्थापकावर कारवाई करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दयावे, अशी मागणी आहे.

माझ्या वडिलांचे कर्जमाफीत नाव आले तेव्हा त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.मी वारसांच्या बाबतीत संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शासनाने आमच्या कर्ज खात्यात रक्कम जमा केली.या वर्षी मी नवीन पिककर्जासाठी अर्ज केला असता ते देण्यास महिन्याभरापासून टाळाटाळ करण्यात येत आहे.मी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.
गजानन विठ्ठलराव जुवारे
मु. आकोली

मी 2011 साली उचल केलेल्या कर्जाची परतफेड 2014 साली केली आहे. त्यावेळी माझ्या सातबारावर बँकेने बोझा चढविला होता. आता हा बोझा उतरवण्यासाठी कर्ज नसल्याबाबत बँकेच्या पत्राची गरज आहे. मी महिन्याभरापासून बँकेत चकरा मारीत आहे.आज या उद्या असे म्हणून माझी बोळवण सुरू आहे.मी जास्तच चकरा मारीत असल्याने आज मला शपथ पत्र आणा म्हणून सांगितले.शपथ पत्राची गरज होती तर त्यांनी मला पहिल्याच वेळी सांगायला पाहिजे होते. इतरांना शपथपत्राशिवाय बोझापत्र दिले आणि मला शपथपत्र सांगितले. या बाबत मी पालकमंत्री केदार यांच्याकडे तक्रार करणार आहे.
चंद्रशेखर गोमासे

या बाबत सुकळी(बाई) येथील बँक व्यवस्थापकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता बँकेचा फोन बंद  होता.