कोरोना प्रतिबंधासाठी महिलांची मोठी भूमिका

गोंदिया,

कोरोना संसर्गाच्या संकटात या महिला आरोग्य अधिकारी उत्स्फूर्तपणे प्रत्यक्ष मैदानात उतरून आपली जबाबदारी आणि कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यासह अनेकजण दिवसरात्र आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. या सर्वांसोबत अनेक महिला पोलिससुद्धा देखील हिरीरीने गोंदिया शहरातील विविध भागात फिरून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध प्रकारच्या जबाबदारी पार पाडत आहेत.

लॉकडाऊनचे पालन व्यवस्थित होत आहे का, याची पहाणी करीत आहेत. जनतेला लॉकडाऊनचे यशस्वी पालन करण्याचे आवाहन करणे, आरोग्य जनजागृती करणे, त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेणे, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध पातळ्यांवर या सर्व महिला अधिकारी व्यापकपणे काम करीत आहेत. तसेच कंटेन्मेंट क्षेत्रात जनतेला आरोग्य सेवा देणे, आयईसी करणे, लोक विनाकारण बाहेर पडत नाहीत ना, तसेच लॉकडाऊनमुळे लोकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होण्यात काही अडचण तर येत नाही ना, कंटेन्मेंट झोनला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना घरीच राहण्याने आवाहन करण्याची जबाबदारी या महिला आरोग्य अधिकारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यासोबतच क्वारंटाईन कक्षांमध्ये लोकांना व्यवस्थित सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का, काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी संबंधितांना सूचना देऊन त्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी सर्व निरिक्षक कटाक्षाने देखरेख ठेवत आहेत. त्यासोबतच या महिला अधिकारी अनेक ठिकाणी, नियुक्त ठिकाणी कर्मचारी क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थित काम करत आहेत काय, त्यांना काही अडचणी आहेत काय त्या सोडविण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन या महिला अधिकारी रुग्णांची भेट घेऊन, त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या जाणून घेतात. समस्या सोडविण्यासाठी तसेच रुग्णांना धीर देऊन लवकर बरे होण्यासाठी प्रोत्साहन देण्यातही या आघाडीवर आहेत.

या आरोग्य आपत्तीच्या काळात आपल्या प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन आपापल्या परीने प्रत्येकाने या लढाईत शंभर टक्के योगदान दिले तर निश्चितच आपण ही लढाई जिंकू हा संदेश आपल्या कामातून देणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांच्या कामाचे जनतेकडून, सहकाऱ्यांकडूनही स्वागत होत आहे. त्यांच्या कामातून इतरांनाही या महामारीच्या संकट काळात स्वत: होवून पुढे येवून काम करण्याची सकारात्मक प्रेरणा मिळत आहे. डॉ. सुवर्णा हुबेकार, डॉ. तृप्ती कटरे, डॉ. नितिका पोयाम, डॉ. अर्चना जाधव, डॉ. मनिषा येडे, डॉ. मीना वट्टी, डॉ. सुवर्णा उपाध्याय आदी डॉक्टर आजही कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना योद्धा म्हणून आरोग्य सेवा देत आहेत.