शेळीने दिला आठ पाय व तीन कान असलेल्या पिलाला जन्म

सालेकस्सा,

माणसामधील सयामी जुळय़ांचा जन्म झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत. इतर प्राण्यांमध्येही अशा काही दुर्मीळ घटना पाहायला मिळतात. अशाच एका घटनेत एका शेळीने छोटय़ा शेळीला (करडू) जन्म दिला. मात्र, हे करडू सर्वसामान्य नाही. त्याला चक्क आठ पाय व तीन तीन कान असल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे.

 प्राण्यांच्या बाळाचा जन्म होण्यापूर्वी त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जैविक बदल झाल्याने अशा अशा घटना घडतात. प्रामुख्याने प्राण्यांमध्ये हा प्रकार आढळतो. सयामी जुळय़ांमध्ये अनेकदा एका धडावर दोन डोकी किंवा कमरेखालील भाग एक अशा बाळांनी जन्म घेतलेल्या घटना अधून-मधून ऐकायला मिळतात. इतर प्राण्यांमध्येही खूपच अपवादात्मक अशा घटना पहायला मिळतात.

 अशीच घटना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात असलेल्या दरबडा या गावी राहत असलेल्या कृष्णा पटले यांच्या घरी घडली .घडलेल्या या घटनेने परिसरातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे शेळीचे करडू पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे गर्दी करीत आहेत. काही लोक याला निसर्गाचा चमत्कारही मानत आहेत. विशेष म्हणजे या करडूची प्रकृती चांगली नसल्यामुळे जन्म झाल्यावर अर्ध्या तासातच मृत्यु झाली. मात्र, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हा कुठलाही चमत्कार नसून दोष असल्याचे म्हटले आहे. अपवादात्मक स्थितीत गर्भधारणेच्या प्रक्रियेदरम्यान जैविक बदल घडून आल्याने असे प्रकार घडण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.