युवकांच्या पुढाकारातून बुजविले मुख्यमार्गावरील खड्डे

  • शासन, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

 सिरोंचा. शहर मुख्यालयातून नगरपंचायत अंतर्गत शिवाजी चौक ते वनविभागाच्या वन उद्यानापर्यंत असरअल्लीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले असताना संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत अनेकदा तक्रारी, निवेदन, आंदोलन करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर स्थानिक युवकांनी पुढाकार घेत श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविले.

  सिरोंचा-असरअल्ली या मार्गावरून पेंटीपाका, आरडा, अंकीसा, असरअल्ली आदी लहान मोठ्या गावासह शेजारच्या छत्तीसगड राज्यातील पातागुडम, तिमेड, जगदलपूर आदी ठिकाणचे प्रवासी ये-जा करीत असतात. मात्र, या मार्गावरील शहरातील शिवाजी चौक ते वनविभागाच्या वनउद्यानापर्यंत जागोजागी दीड ते दोन इंच खड्डे पडले असल्याने या मार्गावरील प्रवास मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आला होता. संबंधितविभागाने या मार्गावरील खड्डे बुजवावे, याकरिता वेळोवेळी आंदोलने छेडून शासन, प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याकडे नेहमीच दुर्लक्षित केल्या गेले.

   मार्गावरील खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले होते. या रस्त्याची डागडुजीकरिता स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला. तसेच शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वंयसेवक समीर अरिगेला, अरुण कामघंटी, सिद्दिक अली, रिजवान खान, जगदिश रालाबंडीवार यांनी प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर व स्थानिक एच. पी. पेट्रोल पंप सिरोंचा यांची भेट घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनीही युवकांच्या कामाला प्रोत्साहन देत रविवारी माती व गिट्टी व ट्रॅक्टर देऊन युवकांना सहकार्य केले. यावेळी स्वत: श्रमदान करीत मार्गावरील 3 किमी अंतरावरील खड्डे बुजाविण्यात आले. या कामाचे शहरातील प्रवाशींनी तसेच नागरिकांनी विशेष कौतुक करीत आभार मानले आहे.