महिलांनी केली दारू जप्त; अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

  • देलोडा बु. येथे अहिंसक कृती

आरमोरी. तालुक्यातील देलोडा (बु) येथे विक्री करण्यासाठी सूर्यडोंगरी मार्गे मोहफुलाची दारू ( Mohaful liquor) आणत असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यावरून एका जणाची तपासणी केली असता त्याच्याकडे ५ लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. घटनास्थळावर पोलिस पाटील यांना बोलावून पंचनामा करण्यात आला.

गाव संघटनेच्या महिलांनी गावातील दारूविक्रीवर बंदी घालण्यासाठी अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार देलोडा (बु)- सूर्यडोंगरी मार्गावर गस्त घातली असता, गावात विक्रीसाठी दारू आणत असल्याचे निदर्शनास आले. महिलांनी त्या इसमास अडवून त्याच्याकडून ५ लीटर मोहफुलाची दारू जप्त केली. महिलांनी जप्त दारू व दारूविक्रेत्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठरविले. मात्र, पूर परिस्थितीमुळे पोलिस स्टेशन गाठता आले नाही. त्यामुळे घटनास्थळावर गावातील पोलिस पाटील, तंमुस अध्यक्ष यांना बोलावून पंचनामा करण्यात आला. गाव संघटनेच्या ताब्यातील जप्त मुद्देमाल पुराचे पाणी उतरताच पोलिसांच्या स्वाधीन केल्या जाणार आहे. महिलांच्या या कृतीमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.