म्हणून तुकाराम मुंढे म्हणाले, प्रत्येकाला कोरोना झाला आहे असे समजा

तुकाराम मुंढेंचा नवा आरोग्य मंत्र

नागपूर,

सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक आगळावेगळा फंडा सुचविला आहे. समोरचा प्रत्येक व्यक्ती हा कोरोनाबाधित आहे, असे समजून स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही आपोआप कोरोनापासून वाचाल, असा सल्ला तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

तुकाराम मुंढे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.  नागपुरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. लोक नियम पाळत नाही. अनलॉक केल्यामुळे फिरण्याची मुभा मिळाली असा लोकांचा गैरसमज होत आहे, असे सांगतानाच करोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. त्याबाबत गंभीर असले पाहिजे. करोना रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा, असे  आवाहनही त्यांनी केले.