जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी

-धान्य, भाजीबाजार देखील राहणार बंद
-कोरोनाची साखळी तोडण्याकरिता उपाय

अमरावती,

जिल्ह्यात कोरोनाने सातवे शतक पूर्ण केले आहे. पुढेही कोरोनाबाधितांची संख्या वाढणारच आहे. ही वाढती संख्या रोखण्यासाठी नागरिकांना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक राहणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी 7 वाजतापासून तर सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे.  या कर्फ्यूत अत्यावश्यक सेवा वगळता जीवनावश्यक वस्तुतील धान्य व भाजी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहे.

विनाकारण बाहेर फिरल्यास होईल कारवाई
लॉकडाऊन उठल्यानंतर शहरात वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू झाली आहे. नागरिकांचा मुक्तसंचार वाढला आहे. मात्र, संचारंबदीदरम्यान कुणी विनाकारण फिरताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनाने विनाकारण फिरणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

सूचनांचे पालन करा
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा दोन दिवसांसाठी संचारबंदी घोषित केली. या संचारंबदीत नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 65 वर्षीय वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षांआतील मुलांनी घराबाहेर पडू नये. कंटेन्मेंट झोनमधील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. या सूचनांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठी मदत होईल, त्यामुळे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या सेवा राहतील बंद
लॉकडाऊन संपल्यानंतर शहरातील मुख्य मार्केट, व्यापारी प्रतिष्ठाने, कॉम्पलेक्स, मॉल्स सम-विषम पद्धतीने उघडण्यात आले. मात्र, आता शुक्रवारपासून लागणाऱ्या संचारबंदीत सर्व व्यापार बंद राहणार आहे. जीवनावश्यक वस्तुतील किराणा दुकाने, धान्य मार्केटमधील प्रतिष्ठानेही बंद राहणार आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी व फळ यार्ड पूर्णपणे पंद राहणार आहे.  शहर व ग्रामीण परिसरातील पर्यटन स्थळ, राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी संस्था, खासगी बँकही बंद राहणार आहेत.

या सेवा राहतील सुरू
जनता कर्फ्यूत अति आवश्यक सेवेतील दुध डेअरी सकाळी 6 ते 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय जनता कर्फ्यूत मेडिकल, रुग्णालये, रुग्णवाहिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत सर्व औद्योगिक आस्थापना, वीज संबंधित, गॅस सेवा, मान्सूनपूर्व काम, रस्ते दुरुस्ती, नाली स्वच्छता आदी कामे सुरू राहतील. तसेच पेट्रोल व डिझेल विक्रीची सेवा रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. एपीएमसीतील गॅरंटी मूल्यातील खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांचा कडक पहारा
जिल्ह्याभरात शुक्रवारी सायंकाळनंतर संचारबंदी लागू होणार आहे. ती सोमवारी सकाळपर्यंत कायम राहील. या अनुषंगाने जिल्हा पोलिस यंत्रणाही सज्ज करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या कडक संचारबंदीत कुणीही विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. यासंबंधी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. शहर तथा ग्रामीण भागातील मुख्य चौकांमध्ये फिक्स पाईंट लावून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. तसेच पेट्रोलिंग पथके विविध परिसरात फिरून संचारबंदीची अमंलबजावणी करणार आहे.