अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

घटनेनंतर वाहन चालक पसार
समुद्रपूर : तालुक्यातील हिंगणघाट- उमरेड मार्गावरील लसनपूर जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटनेनंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. नितीन चपंत चौधरी (45) रा. हिंगणघाट असे आहे
माहितीनुसार कोचर वार्ड येथील नितीन चौधरी हे उमरेड येथे राहत असलेल्या मोठ्या भावाकडे जाण्यास निघाले होते. मात्र त्याच्या जवळ जिल्हा बाहेर जाण्याची पास नसल्याने त्यांना गिरड जवळील जिल्हा सीमेवरील चेकपोस्ट वरून परत पाठविण्यात आले. जून्या मित्राकडे गिरडला थांबून हिंगणघाटकडे एम एच 32 यू 9734 क्रमांकाच्या दुचाकीने परत जात असतांना लसनपुरजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार नितीन चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला. अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांच्या दुचाकीला कोणत्याही प्रकारचा मार नसल्याने त्यांना अज्ञात वाहनाने उडविल्या बाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक ठाकरे यांचे मार्गदर्शनात सूर्यवंशी करीत आहे.