विनाअनुदानित शिक्षकांनाही असावे सेवा संरक्षण

संगीता शिंदे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

अमरावती,

विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित तत्वावरील शाळांमध्ये लाखो शिक्षक कार्यरत आहेत. परंतु, अशा शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंद पडल्यामुळे तेथील शिक्षकांचे कुठेही समायोजन केले जात नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित तत्वावरील शिक्षकांना सेवा संरक्षण देऊन त्यांचे देखील समायोजन करावे. या अनुषंगाने 25 जून 2020 च्या परिपत्रकात सुधारणा करून शुद्धीपत्रक निर्गमित करण्याची मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

शिक्षण विभागाने समायोजनासंदर्भातील परिपत्रक जारी केले असून त्यात विनाअनुदानित तसेच अंशत: अनुदानित शाळेवर अनेक वर्षांपासून अविरत सेवाकार्य करणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात कुठलीही तरतुद नाही. त्यामुळे हे परिपत्रक अशा हजारो शिक्षकांवर अन्याय करणारे आहे. या परिपत्रकाबद्दल रोष व्यक्त करून शिक्षकांकडून तातडीने यावर शुद्धीपत्रक काढण्याची मागणी होत आहे. परंतु, त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याची खंत संगीता शिंदे यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.