अप्पर वर्धाची ११ दारे उघडली

  • ६.२० दलघमी प्रति सेकंद विसर्ग

मोर्शी. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणाची ११ दारे ३५ सेंटीमीटरने उघडण्यात आली असून, धरणातून ६.२० दलघमी प्रती सेकंद विसर्ग सुरू झाला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता सतीश चौव्हान यांनी दिली. या अनुषंगाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या नळ दमयंती सागर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने गुरुवारी दुपारी १ वाजता धरणाच्या एका दारातून पाटबंधारे विभागाने विसर्ग सुरू केला. गुरुवारी रात्री ११ वाजता अप्पर वर्धा जलाशय पूर्ण क्षमतेने भरताच गेट क्रमांक १ व २ उघडून ३५ सेंटीमीटर १६१ दलघमी प्रतिसेकंद विसर्ग सुरू करण्यात आला. रात्री एक वाजता जलाशयाचे ७ दरवाजे ३५ सेंटीमीटर उघडण्यात आले असून ३९४  दलघमी प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता पुन्हा नऊ वक्र दरवाजांच्या माध्यमातून ५०७ दलघमी प्रतिसेकंद विसर्ग सोडण्यात आला.  सकाळी ७ दरम्यान अप्परवर्धा धरणाच्या १३ दरवाजांपैकी ११ दरवाज्यांतून ६२० दलघमी प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने मोर्शीकडून आष्टीकडे जाणारा  मार्ग सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे.

अप्पर वर्धाने गाठली उच्चतम पातळी

सध्या अप्पर वर्धा धरणात पाण्याची उच्चतम पातळी ३४२.२० दलघमी इतकी झाली आहे. म्हणजेच टक्केवारी ९५.१६ इतकी आहे. अप्पर वर्धा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अमरावती शहरासह बडनेरा, मोर्शी येथील पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हंगामातील पिकांना मुबलक पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.