कोरोना हॉटस्पॉटकडे वाशीम जिल्ह्याची वाटचाल 

दीड महिन्यात वाढले 160 कोरोना बाधित

वाशीम,
वाशीम जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दरदिवशी झपाट्याने वाढती संख्या पाहता जनता भयभीत झाली आहे. आगामी काळात रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल, 9 जुलै रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी 20 बाधितांची नोंद झाली. आतापर्यंत वाशीम जिल्ह्यात अवघ्या दिड महिन्यात 160 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्याची हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरु आहे.

टाळेबंदीत मे महिन्या अखेर जिल्ह्यात अवघे 8 बाधितांची नोंद होती. मात्र, अनलॉक सुरु झाल्यापासून परराज्यातून, मुंबई, पुणे, औरंगाबाद या हॉटस्पॉट ठिकाणाहून वाशीम जिल्ह्यात येणार्‍या स्थलांतरीत संख्या वाढली. जिल्हा प्रशासनाने नियम व अटी शिथिल करून टप्याटप्पयाने किराणा दुकान, कापड दुकान, कृषी सेवा केंद्र व इतर व्यवसाय सुरु करण्यास मुभा दिली आणि शहरातील प्रत्येक रस्त्यावर गर्दीने उच्चांक गाठला. व्यापारी प्रतिष्ठाणे व रस्त्यावर सामाजिक दुरावा पाळला जात नसल्याने सामुहीक संसर्ग वाढला.
 
 जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतांना शासनाने जारी केलेल्या संचारबंदी काळातही बाजारपेठ खुली राहत आहे. फळे व भाजीपाल्यासाठी ठराविक झोन तयार केले. मात्र, बहुतांश भाजी विक्रेते हे गल्लीबोळा जावून तसेच रस्त्यावर कोठेही दुकाने लावून व्यवसाय करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. शहरात व जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रत्येक दुकानावर शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमाचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. बहुतांश दुकानात सॅनिटायझर नाही. सामाजिक दुराव्याचे पालन होत नाही. परिणामी सामुहिक संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली.