देवळीच्या आठवडी बाजारातील ओटे सुनसान

  • बाजार रद्द करून प्रशासनाने क़ाय साध्य केले?

देवळी. जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढीवर असल्यामुळे मागील दोन आठवड्यापासून देवळीतील शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार नगर परिषद प्रशासना कडून रद्द करण्यात आला.आठवडी बाजारासाठी जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील अनेक व्यापारी,दुकानदारांची देवळी शहरात मोठी गर्दी व्हायची.यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याच्या भीतीने स्थानिक प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.परंतु बाजार ओट्यावर नियमित भरणारा बाजार ऐन शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी भरू न दिल्याने देवळीतील प्रमुख मार्गावर शहरातील स्थानिक भाजी विक्रेते,फळ विक्रेते,हॉटेल व्यवसायिकांनी उपजीविकेसाठी नाईलाजास्तव दुकाने थाटली.

नियमित भरणारी बाजाराची जागा कोरोना काळापासून सुसज्ज अशी आहे.शारीरिक अंतराचे पालन करण्यासाठी रकाने आखले आहे.ध्वनिक्षेपाच्या माध्यमातून माहिती देण्याची व्यवस्था केली गेली आहे.एवढी सर्व सुसज्ज व्यवस्था असताना शुक्रवारी नियमित आठवडी बाजार भरू देण्यास प्रशासनाला अडचण काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.बाजार रद्द केला गेला तरी सुद्धा देवळी शहराच्या प्रमुख मार्गाने आठवडी बाजार भरला गेला.बाजार ओट्यावरील बाजार रद्द करून शहरात बाजार भरला गेला व यामुळे शहराच्या प्रमुख मार्गावर वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या तसेच शारीरिक अंतराचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येत आहे.या सर्वाला प्रशासन जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.बाजार रद्द करून प्रशासनाने नेमकं क़ाय साध्य केलं? हा प्रश्न आता नागरिकांतून विचारल्या जात आहे. तसेही बाहेर गावातील व्यावसायिकांना बाजारात येण्यास मनाई आहे. मग गावातीलच भाजी विक्रेत्यांना मनाई कशासाठी?याउलट बाजार नेहमीच्या जागीच भरू दिला गेला असता तर शहरात वाहतुकीचे तसेच गर्दीचा प्रश्न निर्माण झाला नसता. यावर प्रशासनाने मंथन करून पुढील आठवडी बाजार स्थानिक दुकानदारांना घेऊन नेहमीच्या ठिकाणावरच भरवावा,अशी मागणी करण्यात येत आहे.