कोरोनाने भल्याभल्याची हवा काढली. मात्र, सांगलीच्या 70 वर्षांच्या रत्नाबाई आजी चक्क पंक्चर काढून आपल्या आपल्या संसाराचा गाढा हाकत आहेत. अपंग मुलगा आणि शरीराने थकलेले पती यांना त्या आपल्या कष्टाने जगण्याची प्रेरणा देत आहेत. रत्नाबाई रामचंद्र जंगम... सांगलीच्या 100 फुटी रोडवर त्यांच जंगम पंक्चर दुकान आहे. सकाळी 10 वाजता सुरू झालेले दुकान रात्री 8 वाजता बंद होते. पंक्चर काढणे बाई माणसाचे काम नाही असा या आजीबाईंनी मोडून काढला आहे. रत्नाबाईंचा मोठा मुलगा दीपक ऐन तारुण्यात निघून गेला. मग त्याने सुरू केलेला पंक्चर दुकान त्यांचे पती सांभाळू लागले. मात्र, शरीर साथ देत नसल्याने दुकान येणारे ग्राहक परत जाऊ लागले. घरात एक अपंग मुलाचे संगोपन आणि पोटाची आग आजीबाईंना काही स्वस्थ बसू देईना. यामुळे आजीबाईंनी स्वत: पंक्चर काढण्याचे काम शिकून घेतले. मग काय पुन्हा एकदा जंगम पंक्चर दुकानात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. आपल्या कामाने आजींनी अनेक ग्राहक जोडले आहे. या दुकानातुन आजी दिवसाला 300 ते 350 रुपयांची कमाई करतात. जिद्द आणि मेहनतीला वयाची मर्यादा नसते हेच या आजीबाईंनी सिद्ध करुन दाखवले आहे.