अरे देवा, २००० रुपयांचा वडापाव पण आम्हाला परवडणार नाय ; जाणून घ्या कसा आहे थाट

  मुंबई : वडापाव हा मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचं महत्त्वाचं अंग आहे, ही बाब सर्वज्ञात आहे. सर्वसामान्य चाकरमानी, आणि रोजंदारी कामगारांच्या हक्काचं दोन वेळचं खाद्य. दोन वडापाव फस्त करायचे आणि आलेला दिवस ढकलायचा असं अनेकांचं समीकरण असतं. हा पदार्थ खाऊन माणसाला कधीही कंटाळा येत नाही. खमंग वासाच्या ओढीने अनेकांची पावलं वडापावच्या गाडीकडे वळताना दिसतात. कारण तुम्हाला याला इग्नोर करून पुढे जाताच येत नाही. एवढं त्याचं अढळ स्थान प्रत्येक चाकरमान्याच्या मनात आहे.

  मुंबईत अनेक ठिकाणं अशी आहेत जी फक्त वडापाव या एका गोष्टीमुळे फेमस झाली आहेत. त्याचं सामान्यांच्या मनातलं स्थान आजही तसंच आबाधित आहे.

  एकदाही वडापाव खाल्ला नाही, अशी व्यक्ती मुंबईत सापडण्याची शक्यता फारच विरळा. कारण वडापाव हा मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि नाक्यावर मिळतो. वडापावची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी असल्यामुळे हा खाद्यपदार्थ सामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, हाच वडापाव २००० रुपयांना मिळत असेल तर. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे.

  सध्या सोशल मीडियावर सोन्याचा वर्ख असलेल्या वडापावची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. हा वडापाव संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) O,Pao नावाच्या हॉटेलच्या मेन्यूमध्ये आहे. या वडापावची किंमत ९९ दिरहम म्हणजे तब्बल २००० रुपये इतकी आहे. हा जगातील पहिला गोल्ड प्लेटेड वडापाव असल्याचा दावा हॉटेलने केला आहे. यामध्ये वड्याला २२ कॅरेटच्या सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. वडा तयार करण्यासाठी ट्रफल बटर आणि चीज स्टफिंग वापरण्यात आले आहे.

  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

   

  View this post on Instagram

   

  A post shared by O’Pao (@opaodxb)

  सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. opaodxb या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

  वडापावची किंमत ऐकून नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

  या गोल्ड प्लेटेड वडापावची किंमत ऐकून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दहा ते बारा रुपयांना विकल्या जाणाऱ्या वडापावची किंमत थेट 2000 रुपयांवर नेणे ही बाब अनेकांच्या पचनी पडलेली नाही.