घोडा शर्यतीवेळी टांगा पलटी; अपघाताचा थरार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्पर्धेतील घोड्यांचा अचानक पाय घसरल्यामुळे घोड्याचा अपघात झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

    कोल्हापूर : सध्या राज्यामध्ये जत्रेचा हंगाम सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी जत्रेच्या विविध परंपरा असतात. यामध्ये कुस्ती, लोकनाट्य, बैलगाडा शर्यत तसेच घोडा शर्यत ठेवली जाते. याप्रमाणे कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे घोडा शर्यत भरवण्यात आली होती. येथे एक भयानक अपघात घडला. स्पर्धेतील घोड्यांचा अचानक पाय घसरल्यामुळे घोड्याचा अपघात झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

    पुलाची शिरोली येथे शिवलिंग बिरदेव आणि पीर अहमदसो यात्रेनिमित्त घोडागाडी व बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. शिरोलीच्या माळवाडी परिसरामध्ये घोडागाडीची स्पर्धा सुरु झाली. मात्र यावेळी जोडीने पळणाऱ्या घोडागाडीमधील एका घोडाचा पाय घसरला. त्यामुळे घोडागाडींचा अपघात झाला.

    एका घोडाच्या पाय घसरल्यामुळे सोबत जोडीला असणारा घोडा देखील घसरला. त्यामुळे मागे धावत असलेल्या घोडागाडी देखील घसरल्या. त्याचबरोबर सोबत असणारे दुचाकी स्वार देखील घसरुन खाली पडले. या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडिओवर उलट सुलट कमेंट केल्या आहेत. खुल्या मैदानामध्ये शर्यत न भरवता डांबरी रस्त्यावर भरवल्यामुळे हा अपघात झाल्याच्या चर्चा होत आहेत.