ईशान किशन सुपरमॅनच्या ड्रेसमध्ये एअरपोर्टवर; मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने दिली शिक्षा

सुपरमॅनचा ड्रेस घालून ईशान किशन एअरपोर्टवर फिरताना दिसला. त्याचा हा अनोखा ड्रेसकोड पाहून फॅन्सही चक्रावून गेले

    मुंबई – सध्या आयपीएलचा हंगाम रंगला आहे. यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाकडून अद्याप चांगली खेळी खेळण्यात आलेली नाही. दरम्यान मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन एका भलत्याच अवतारात समोर आला. सुपरमॅनचा ड्रेस घालून ईशान किशन एअरपोर्टवर फिरताना दिसला. त्याचा हा अनोखा ड्रेसकोड पाहून फॅन्सही चक्रावून गेले. मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून यामागचे खरी कारणं दिली आहे.

    ईशान किशनच सह संघातील इतर तीन खेळाडूंनाही शिक्षा मिळाली आहे. फिरकीपटू कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा यांनाही फ्रेंचायसीने वठणीवर आणलं आहे. चारही जणं हॉटेलच्या रुममधून सुपरमॅनचा ड्रेस घालून बाहेर पडले. मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने दिलेल्या कारणावरुन हा कोणताही ड्रेसकोड नसून ही एक शिक्षा आहे. मुंबई इंडियन्सने टीम मीटिंगमध्ये उशिराने येणाऱ्यांसाठी ही आयडीया शोधून काढली आहे. टीमने शोधून काढलेल्या शिक्षेच्या या भन्नाट कल्पनेवर सर्व नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

    त्याचबरोबर नेहल वढेराही फलंदाजी मीटिंगमध्ये उशिराने पोहोचला. त्यामुळे त्याला देखील एअरपोर्टवर पॅड बांधून चालण्याची शिक्षा मिळाली होती. यावेळी सर्वजण नेहल वढेराकडे टक लावून पाहात होते. “मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू नेहल वढेराने मुंबई विमानतळावर त्याच्या ओओटीडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक जंपसूट ऐवजी पॅडसह दिसला. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहलला फलंदाजांच्या बैठकीला उशीर झाल्याबद्दल खेद वाटतो.”, असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.