Sweet Potato Halwa : हिवाळ्याच्या दिवसांत रताळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. थंडीच्या वातावरणात याचे सेवन आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते अशात तुम्ही यापासून गोडसर आणि चविष्ट असा हलवा तयार करू शकता.
रताळे भाजून किंवा उकडून खाण्याऐवजी तुम्ही यापासून चविष्ट असा हलवा तयार करू शकता
हा हलवा पौष्टिक ठरेल कारण यात साखरेचा नाही तर गुळाचा वापर केला जाणार आहे
रताळे ही अशी गोष्ट आहे जी भारतीय घरांमध्ये उपवासापासून दैनंदिन जेवणापर्यंत कुठेही वापरली जाते. थंडीत शरीराला गरम ठेवण्यासाठी आणि झटपट ऊर्जा देण्यासाठी रताळ्यापेक्षा उत्तम पर्याय नाही. त्यात भर म्हणजे त्यापासून बनलेला हलवा मऊ, सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट! रताळ्याचा हलवा बनवायला सोपा असून त्यात फार कमी साहित्य लागते. सण, पाहुणे किंवा अचानक गोड खायची इच्छा… अशावेळी झटपट हा हलवा बनवता येतो. उकडलेल्या रताळ्याची नैसर्गिक गोडी, तुपाचा मोहक सुगंध आणि गुळाची चव यामुळे हा हलवा कुणालाही लगेच आवडतो. आज आपण साखरेचा वापर न करता रताळ्याचा हलवा कसा तयार करायचा याची एक सोपी आणि चविष्ट रेसिपीजाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम रताळे व स्वच्छ धुवून घ्या. नंतर प्रेशर कुकरमध्ये किंवा भांड्यात मऊ होईपर्यंत उकळून घ्या. उकडल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्या आणि त्याची साल काढा.
उकडलेले रताळे एका भांड्यात छान मॅश करून घ्या. कढई गरम करून त्यात एक चमचा तूप घाला. तूप गरम झाले की काजू-बदाम हलके सोनेरी होईपर्यंत परतून एक ताटात काढून ठेवा.
आता त्याच कढईत थोडे अजून तूप घाला आणि मॅश केलेले रताळे टाका. सतत ढवळत २–३ मिनिटे परता. मग त्यात दूध घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
मिश्रण घट्ट झाल्यावर किसलेला गूळ आणि वेलदोडा पावडर घाला. गूळ पूर्ण वितळेपर्यंत आणि हलवा
चमच्याला सुटेपर्यंत शिजवा. शेवटी भाजलेले काजू-बदाम घालून हलक्या हाताने मिसळा.
गरमागरम, सुगंधी रताळ्याचा हलवा पाहुण्यांना किंवा कुटुंबाला सर्व्ह करा.