nanded sholay style of husband

बायको माहेरून परत नांदायला येत नाही म्हणून पाण्याच्या टाकीवर चढून एका युवकाने चक्क शोले स्टाईल (Sholay Style) आंदोलन केलं. नांदेडच्या या शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देवीदास येरगे (Devidas Yerge).

    नांदेड : महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded) आज शोले स्टाईल (Sholay Style Protest) सीन बघायला मिळाला. एक युवक पाण्याच्या मोठ्या उंच टाकीवर चढला. त्याची बायको माहेरून परत नांदायला येत नाही म्हणून पाण्याच्या टाकीवर चढून त्याने चक्क शोले स्टाईल आंदोलन केलं. नांदेडच्या या शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देवीदास येरगे (Devidas Yerge).

    याबाबत मिळालेली माहिती अशी की रोजच्या भांडणांना वैतागून त्या युवकाची पत्नी सहा महिन्यांपूर्वीच माहेरी निघून गेली होती. त्यानंतर पतीने अनेकदा आपल्या बायकोला समजावून परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. बायको माहेरवरून येत नाही म्हटल्यावर त्याने अनोखं आंदोलन करायचं ठरवलं आणि तो पाण्याच्या टाकीवर उंच चढला आणि आंदोलन करु लागला.

    देवीदास येरगे हा गृहस्थ नांदेड जिल्ह्यातील अंबानगर भागात राहतो. आपल्या बायकोला नांदायला परत आणण्याच्या मागणीसाठी तो आज सकाळी सात वाजता शोभानगर भागातील टाकीवर चढला. माझ्या बायकोला परत बोलवा नाहीतर मी टाकीवरून उडी मारेन असं सांगून तो धमकी देऊ लागला. साधारण सात तास तो त्या टाकीवर उभा होता आणि बायकोला परत बोलवा हे वारंवार सांगत होता. त्यानंतर फायर ब्रिगेड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पाणी देण्याच्या बहाण्याने खाली उतरवलं.

    देवीदासचा हा शोले स्टाईल ड्रामा बघायला आख्खा गाव गोळा झाला होता. जसंजसं लोकांना कळलं की एक माणूस आपली बायको माहेरी गेली असल्याने आणि ती नांदायला परत येत नसल्याने आंदोलन करतोय आणि तो टाकीवर चढला आहे, तसतशी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. स्थानिक लोकांनी देवीदासला खूप समजवण्याचा आणि खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कुणाचं ऐकलंच नाही.शेवटी पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी युक्ती वापरून त्याला खाली उतरवलं. नाहीतर हे प्रकरण त्याच्या जीवावर बेतलं असतं. शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या या वीरूविषयी सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.