राजीनाम्यानंतर पठ्ठ्याने थेट कंपनीत नेला ढोल ताशा; नाचत बॉसला केला ‘राम राम’; व्हिडिओ व्हायरल

  पुणे – ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणतात ते काही खोटे नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका नोकरदार व्यक्तीने नोकरी सोडल्याचा आनंद अगदी अनोख्या पद्धतीमध्ये केला आहे. जॉब लागणे अवघड असल्याच्या युगामध्ये या तरुणाने चक्क काम सोडल्याचा आनंद वाजत गाजत आणि नाचत साजरा केला आहे. यासाठी तरुणाने चक्क ऑफिसमध्ये ढोल ताशा नेला आहे. सोशल मीडियावर या तरुणाची व्हिडिओ व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.

  आयटी कंपनीमध्ये काम मिळवणे हे अनेक जणांचे स्वप्न असते. मात्र एका तरुणाने चक्क जॉब सोडल्याचा आनंद साजरा केला आहे. पुण्यातील अशाच एका कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला असून कंपनीतील शेवटचा दिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. सध्या, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनिश भगत या इंस्टाग्राम युजर्सने सोशल मीडियावर अनिकेतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, अनिकेतने आपल्या नोकरी सोडण्याचे कारण सांगितले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anish Bhagat (@anishbhagatt)

  व्हायरल झालेली हा व्हिडिओ व्लॉग स्वरुपामध्ये आहे. यामध्ये अनिकेतने नोकरी सोडल्याचे कारण सांगितले आहे. त्याने सांगितले की, मी गेल्या तीन वर्षांपासून कंपनीत नोकरी करत होतो. मात्र, गेल्या तीन वर्षात केवळ काही प्रमाणात माझ्या पगारात वाढ झाली. तसेच, कंपनीत काम करताना बॉसकडूनही आदर, सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे, मी नोकरी सोडल्याचे” अनिकेतने सांगितले. अनिकेतच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याचे सहकारी मित्र एकत्र आले. विशेष म्हणजे त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेरच ढोल-ताशा आणला होता. कंपनी कार्यालयाबाहेरील हे दृश्य पाहून अनिकेतचा बॉस संतप्त झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसेच, ढोल-ताशा वाजवत कार्यालयात येऊ पाहणाऱ्या अनिकेतच्या मित्रांना बाहेर ढकलत असल्याचेही दिसते. यानंतर त्यांनी जॉब सोडल्याचा आनंद पार्टी करत साजरा केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.