भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधींचा ट्रकमधून प्रवास; चालकांच्या समस्या जाणून घेतल्या, व्हिडिओ व्हायरल!

या देशाला प्रेम आणि शांततेच्या मार्गावर परतायचे आहे, हळूहळू हा देश राहुल गांधींच्या बरोबरीने वाटचाल करू लागला आहे. असं काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी म्हण्टलं आहे.

  कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka Election ) विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ट्रकमधून प्रवास करताना दिसले. राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना झाले. वाटेत अंबाला ते चंदिगड असा ट्रकने प्रवास केला. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहुल ट्रकमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला असुन या व्हिडिओवर अनेक कंमेटस येताना दिसत आहे.

  हा व्हिडिओ सोमवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांनी अंबाला येथे ट्रक चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाहनचालकांच्या समस्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  राहुल गांधीचं होतय कौतुक

  काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, राहुल गांधी विद्यापीठातील विद्यार्थी, खेळाडू, नागरी सेवेची तयारी करणारे तरुण, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमधील सामान्य नागरिक आणि आता मध्यरात्री ट्रकचालकांना का भेटत आहेत?  कारण त्याला या देशातील लोकांचे ऐकायचे आहे, त्यांची आव्हाने आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत. त्यांना हे करताना पाहून एक विश्वास दिसून येतो, कोणीतरी आहे जो लोकांच्या पाठीशी उभा आहे, कोणीतरी आहे जो त्यांच्या उद्याच्या चांगल्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. कोणीतरी आहे जो द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडत आहे. आणि हळुहळू हे लक्षात येत आहे की, या देशाला प्रेम आणि शांततेच्या मार्गावर परतायचे आहे, हळूहळू हा देश राहुल गांधींच्या बरोबरीने वाटचाल करू लागला आहे.

  भारत जोडो यात्रेत सक्रीय सहभाग

  काही दिवसापुर्वी राहुल गांधींनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती. हा प्रवास कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाला. ही यात्रा १२ राज्यांतून गेली आणि जानेवारीत जम्मू-काश्मीरमध्ये संपली. 136 दिवसांच्या या प्रवासात राहुल यांनी 4000 किलोमीटरहून अधिक अंतर पार केले होते.