स्पायडरमॅन आणि स्पायडर-वुमनवर कारवाईचा बडगा; गाडीवर स्टंट करणं पडलं महागात

स्पायडरमॅन आणि स्पायडर-वुमनच्या म्हणून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या कपलवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

    सध्या अनेकजण रिल्स काढून सोशल मीडियावर शेअर करत एन्फ्लुएन्सर होत आहेत. मात्र दिल्लीमधील एका जोडप्याला रिल्स काढून सोशल मीडियावर शेअर करणं महागात पडलेलं आहे. रस्त्यावर स्टंट करत व्हिडिओ काढल्याने दिल्ली पोलिसांनी या जोडप्यावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. स्पायडरमॅन आणि स्पायडर-वुमनच्या म्हणून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या कपलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. स्पायडरमॅनच्या वेषात स्टंट करणारे हे कपल सध्या तुफान व्हायरल झाले आहे.

    “स्पायडरमॅन नजफगढ पार्ट 5” शीर्षक असलेला हा व्हिडिओ नजफगढ येथील 20 वर्षीय आदित्यने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट ‘इंडियन स्पाइडी ऑफिशियल’ वर पोस्ट केलेल्या मालिकेचा भाग होता. 9,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या या खात्यामध्ये स्पायडरमॅनच्या वेशभूषेत विविध स्टंट्स आणि अँटीक्स आहेत, ज्यामध्ये तो पुशकार्टमधून कांदे विकताना दिसतो. दिल्ली वाहतूक पोलिसांनी या जोडप्याला अटक केली करत त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई केली आहे. हे कपल हेल्मेट न घालता, आरसे किंवा दृश्यमान नंबर प्लेटशिवाय दुचाकीवर फिरत स्टंट करत होते. यामुळे दिल्ली पोलिसांनी सदर कारवाई केली आहे. नंतर या जोडप्याला जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

    अनेक लोक गाड्यांवर जीवघेणी स्टंटबाजी करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असतात. कारवाई करण्य़ात आलेला आदित्य यापूर्वी देखील अशाच पद्धतीचे स्टंट करत होता. याआधीही त्याचे सुपरहिरोच्या वेश्यात स्टंट करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अलिकडे धोकादायक स्टंट करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे अनेक लोकांनी खास करुन तरुणांनी जीव देखील गमावला आहे.