‘आता नरेंद्र मोदी फोन करणार तेव्हाच…’ महिलेचा रस्त्याच्या मधोमध घातला गोंधळ; पोलीस कर्मचाऱ्याशी केलं गैरवर्तन

वांद्रे-वरळी सी-लिंकवर, एका महिलेने पोलिसांना तिची बाइक ओव्हर स्पीड चालवण्यापासून रोखल्यानंतर थेट पंतप्रधान मोदींना फोन करण्यास सांगितले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  मुंबई : मुंबईत वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडणाऱ्यांना रोखणं वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कधी ओव्हरस्पिड तर कधी विना हेल्मेट प्रवास करणारे नियम मोडताना दिसतात याउलट पोलिसांसोबत हुज्जतही घालताना दिसतात. आता पुन्हा असचं एक प्रकरण समोर आलं असून एका महिलेने वाहतूक पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Mumbai Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर  (worli bandra sea link) हेल्मेट न घालता दुचाकी चालवत आहे आणि पोलिसांनी तिला थांबवल्यानंतर तिने त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

  काय म्हणाली महिला?

  वाहतूक पोलिसांनी महिलेला थांबवल्यानंतर महिलेने रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महिलेला दुचाकी बाजूला करून थांबवण्यास सांगितले असता तिने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. महिलेने पोलिस कर्मचाऱ्याला सांगितले की, आता नरेंद्र मोदींनी सांगितले तरच दुचाकी थांबेल.

  BSE गाडी थांबवेल, हात लावायची हिंमत करू नका

  पोलिसांसोबत गैरवर्तन करताना ही महिला इथेच थांबली नाही. पोलीस कर्मचाऱ्याने अनेकवेळा समजावल्यानंतरही महिलेने वाद सुरूच ठेवला आणि निरर्थक बोलायला सुरुवात केली. व्हिडीओमध्ये पुढे महिला म्हणते की ही ट्रेन आता थेट बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये थांबेल, तुम्हाला जे हवे ते करा.
  ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने गाडी पकडल्यावर महिलेने माझ्या गाडीला हात लावण्याची हिंमत केली तर हात कापून टाकेन, अशी धमकी देऊ लागली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.