प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वर्धा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मार्च महिन्यात कोविडने गती घेतली असून कोरोनामुळे मृत्यूचा आकडाही वाढतीवर आहे.

    रामेश्वर काकडे
    वर्धा (Wardha).  मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मार्च महिन्यात कोविडने गती घेतली असून कोरोनामुळे मृत्यूचा आकडाही वाढतीवर आहे.18 मार्चपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 400 बळी घेतल्याने आरोग्य यंत्रणाही हातबल झाली आहे.

    आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबिधितांचा आकडा 16 हजारांवर पोहचला आहे. 18 मार्चपर्यंत कोरोना चाचणीसाठी एकूण 1 लाख 64 हजार 578 स्त्राव नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी एक लाख 64 हजार 567 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक लाख 47 हजार 687 अहवाल निगेटिव्ह आले. तर 11 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या 15 हजार 707 एवढी झाली आहे. तर बुधवारपर्यंत एकूण 13 हजार 874 कोरोनामुक्त झाले. सध्या ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 1433 इतके आहेत.

    यावर्षीच्या जानेवारी महिन्यात बाधित रुग्णांची संख्या 10 हजारावर होती. तर त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून आजपर्यत दरदिवशी सरासरी 110 रुग्ण वाढले असून 45 दिवसांतच कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल पाच हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली व कुटुंबाची खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा आकडा असाच वाढत राहिल्यास जिल्ह्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी रुग्णालये कोविड रुग्णांनी हाऊसफुल्ल होणार आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना रोखण्यासाठी खबरदारी घेतली तरच कोरोनाचा संसर्ग आटोक्यात राहील. वर्धा जिल्ह्यात 9 मे 2020 पर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र, नवीन वर्षात कोविडच्या संसर्गात प्रचंड वाढ झाली आहे.

    नऊ दिवसांत १९११ बाधित
    जिल्ह्यात मागील नऊ दिवसांत तब्बल 1911 व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत. त्यात 10 मार्चला 191, 11 मार्चला 255, 12 मार्चला 156, 13 मार्चला 234, 14 मार्चला 201, 15 मार्चला 113, 16 मार्चला 254, 17 मार्चला 252, 18 मार्चला 255 अशा एकूण 1911 व्यक्ती नऊ दिवसांत बाधित झालेल्या आहेत.

    वर्धा तालुक्यात सर्वाधिक बाधित
    गेल्या नऊ दिवसांची बाधितांची आकडेवारी पाहता वर्धा तालुक्यात सर्वाधिक 1157 रुग्ण पॉझिटिव झाले आहेत. यावरून जिल्ह्यात वर्धा तालुकाच कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे दिसून येते.