कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

जिल्हयात कोविड विषाणुमूळे बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्नसमारंभ यासाठी ५० व्यक्तींना उपस्थितीचे बंधन आहे.

  • कोरोना प्रतिबंधासाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास मज्जाव
  • कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता
  • घाबरू नका काळजी घ्या

वर्धा, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास मज्जाव करण्यात आला असून लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींचे बंधन ठेवण्यात आले आहे.

जिल्हयात कोविड विषाणुमूळे बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्नसमारंभ यासाठी ५० व्यक्तींना उपस्थितीचे बंधन आहे. तसेच कोणत्याही कार्यक्रमाकरिता संबधित कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. मिरवणूक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बुधवारी आदेश दिले आहेत. कोरोना लसीकरणामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाबतीत लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला आहे.

शहरी व ग्रामीण भागाकरीता जमावबंदीचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. निमय मोडल्यास याबाबत स्थानिक प्रशासन व पोलिस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. मंगलकार्यालये, हॉटेल्स, कॉन्फरन्स रुम व तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम स्थळांच्या ठिकाणी नियमांचा भंग केल्याचे आढळल्यास ही ठिकाणे सील करण्यात येतील. हॉटेल / पानटपरी / चहाची टपरी / चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे, तसेच निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. सदर ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यवसायीक / दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सर्व धार्मीक संस्था / प्रार्थनास्थळे यांनी त्यांचे संस्थान मस्जीद, मंदीर, चर्च व इतर धार्मिक संस्थानामध्ये / कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करणे तसेच परिसराचे व वारंवार स्पर्श होणाऱ्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत उ.वि.अ. तथा इंन्सिडंट कमांडंट यांनी दक्षता घेऊन व आवश्यक पथकाचे गठण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील.

दोन जिल्ह्यांचे नियम वेगवेगळे

वर्धा जिल्ह्यातआज जमावबंदी लागू करताना रेस्टोरंटआणि हॉटेल रात्री ९ पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे परंतू लगतच्या अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात असतानाही तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी रेस्टोरंट आणि हॉटेलला रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे.

दुकानांना सांयकाळी सात वाजेपर्यंत मूभा
रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता इतर दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत आणि व रेस्टारंट व हॉटेल्स रात्री ९ वाजेपर्यंत चालू राहतील. महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. मात्र, यापूर्वीच सुरु असणाऱ्या इतर शैक्षणिक संस्था, महाविद्यालये पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. या कालावधीत ऑनलाईन / दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खासगी आस्थापना / दुकाने या ठिकाणी मास्क घालून / फेस कव्हर असलेल्या व्यक्तीनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलच्या आतमध्येसुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनि भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये अतिथी ,ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स, मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.

सार्वजनिकस्थळी थुंकल्यास दंड
सार्वजनिकस्थळी थुंकल्यास ५०० रुपये दंड, मास्क न लावल्यास २०० रुपये दंड, दुकानदार, फळभाजीपाला विक्रेते. सर्व जिवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सोशल डिस्टंसिंग न राखणे, ग्राहकामध्ये कमीत कमी तीन फूट अंतर न राखणे, विक्रेत्यांने मार्कीग न करणे, यासाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार येईल.