धाम प्रकल्पाच्या पातळीत पाच टक्क्यांची वाढ; आठ दिवसांपूर्वी होता ३४ टक्के पाणीसाठा

यावर्षी अजूनही पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील मदन उन्नई धरण व सुकळी लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. तर गतवर्षीच मदन उन्नई धरण व वर्धा कार नदी प्रकल्प हे दोन्ही धरण 100 टक्के भरले होते.

  वर्धा (Wardha) : जिल्ह्यात 57 टक्के पर्जन्यमान झाले असले तरी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अद्याप तहानलेलेच आहेत. शहराची तहान भागविणा-या धाम प्रकल्पात (The Dham project) आजघडीला 39 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील आठ दिवसांपूर्वी प्रकल्पातील साठा 34 टक्क्यांवर होता. पाऊस न झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येईल, असे नगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले होते. मात्र, त्यात पाच टक्के वाढ झाल्याने शहरवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे.

  यंदा अर्धा ऑगस्ट महिना संपेपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे वर्धा शहराला पाणीपुरवठा करणा-या धाम धरणातही फक्त ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता; परंतु मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. या महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर उपलब्ध पाणीसाठ्यानेही तळ गाठला असता. त्यासाठी वर्धा वासीयांना यापुढेही पाण्याचा जपून वापर करणे गरेजेचे आहे. आगामी काळात मुबलक पाऊस न झाल्यास नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले होते.

  वर्धा जिल्ह्यातील धरणांत ६५ टक्के पाणीसाठा (65% water storage in dams in the district)
  जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा एकूण 65 टक्के उपलब्ध आहे. असे असले तरी शहराला पाणीपुरवठा करणा-या धाम प्रकल्पात आजघडीला 39 टक्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. याशिवाय बोर प्रकल्प 67 टक्के, निम्न वर्धा 72 टक्के, पोथरा 100 टक्के, पंचधारा 41 टक्के, डोंगरगाव 48 टक्के, मदन 58 टक्के, लाल नाला 77 टक्के, वर्धा कार नदी 29 टक्के याप्रमाणात उपयुक्त पाणीसाठा आहे.

  दोन प्रकल्प अद्यापही कोरडेच
  यावर्षी अजूनही पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील मदन उन्नई धरण व सुकळी लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. तर गतवर्षीच मदन उन्नई धरण व वर्धा कार नदी प्रकल्प हे दोन्ही धरण 100 टक्के भरले होते.

  गतवर्षी धाम प्रकल्प १०० टक्के भरला होता (Last year, the Dham project was 100 percent full)
  शहराला पाणीपुरवठा करणा-या धाम धरणात गतवर्षी 18 आँगस्टला 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता; मात्र मागील वर्षीची तुलना केली असता यंदा 61 टक्के पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येते. सध्या 39 टक्के एवढा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी 59.485 दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. तर सध्या 23.309 दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.