जबरीने पैसे हिसकावणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

प्रकरणातील फिर्यादी हे आपल्या दुचाकीने नागपूरवरून २१ मार्च रोजी येत होते. यादरम्यान, त्यांना दुपारच्या सुमारास भोवळ आल्याने गाडी थांबवून रोडच्या बाजूला बसले असता तिथे दुचाकीने चार अनोळखी इसम आले.

    रामेश्वर काकडे
    वर्धा (Wardha).  प्रकरणातील फिर्यादी हे आपल्या दुचाकीने नागपूरवरून २१ मार्च रोजी येत होते. यादरम्यान, त्यांना दुपारच्या सुमारास भोवळ आल्याने गाडी थांबवून रोडच्या बाजूला बसले असता तिथे दुचाकीने चार अनोळखी इसम आले. त्यांनी तेरे जेब में क्या है दे दे “असे म्हणून फिर्यादीला लाथा बुक्यानी मारून फिर्यादीच्या खिशातील पॉकेट ज्यात २५०० रुपये व एटीएम कार्ड तसेच इतर कागदपत्रे, मोबाईल ८ हजार रुपये असा एकूण १०,५०० रुपयांचा माल जबरीने हिसकावून नेला.

    फिर्यादीच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी/पोलिस अंमलदार यांना मार्गदर्शन करून दिलेल्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी सांगितले. त्याअनुषंगाने एक पथक तयार करून गुन्ह्यातील वर्णनाच्याआ आरोपींचा शोध सुरु करण्यात आला. त्यानुसार मिळालेल्या मुखबीरच्या गोपनीय माहितीवरून १) विक्रमसिंग सबजीतसिंग टाक (वय १९ वर्ष) २) अजय मुरलीधर ठाकरे (वय ३० वर्ष) दोन्ही, रा सिखबेडा सावंगी मेघे, ३) आकाश वामन साटोणे (वय ३१ वर्ष), रा. पोटदुखे ले-आऊट, सावंगी मेघे, ४) सौरभ अनिल वनकर (वय २४ वर्ष) रा. होमगार्ड ऑफिसजवळ, वर्धा यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

    त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल किमत ८ हजार, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एमएच-३२/के-११२ किमत २० हजार, एमएच-३२/के-३५४ किमत २० हजार असा एकूण ४८ हजार रुपयांचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.

    सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर. अपर पोलिस अधीक्षक यशवंत साळुंखे, पोलिस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात सपोनि महेंद्र इंगळे तसेच पोलिस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, संघसेन कांबळे, विकास अवचट, रितेश शर्मा, राकेश आष्टणकर यांनी केली.