अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर होणार कारवाई; नगर परिषदेच्या भाजी विक्रेत्यांना सूचना

भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांचा वाद संपुष्टात आला. खासदार रामदास तडस यांच्याकडे झालेल्या चर्चेनुसार गोल बाजार परिसरातील जुन्या भाजी व फळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची सर्वसंमतीने परवानगी मिळाल्यानंतर अधिकृत विक्रेत्या व्यतिरिक्त हातगाडी लावल्यास किंवा व्यवसाय केल्यास दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे.

    वर्धा (Wardha).  भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांचा वाद संपुष्टात आला. खासदार रामदास तडस यांच्याकडे झालेल्या चर्चेनुसार गोल बाजार परिसरातील जुन्या भाजी व फळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची सर्वसंमतीने परवानगी मिळाल्यानंतर अधिकृत विक्रेत्या व्यतिरिक्त हातगाडी लावल्यास किंवा व्यवसाय केल्यास दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे. नगरपालिकेने याबाबत सर्वांना सूचित केले आहे.

    खासदार रामदास तडस यांच्याकडे बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार अंबिका चौक ते गोल बाजार परिसरापर्यंत फक्त 33 जुन्या भाजीविक्रेते फळविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याचे ठरले. त्यानुसार आज पोलीस प्रशासनाच्या वतीने वर्धा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्‍यबीर बंडीवार त्यांच्या सहकाऱ्यासह गोल बाजार परिसरात आले होते. त्याचप्रमाणे नगरपरिषदेचे अधिकारीसुद्धा याठिकाणी आले होते. व्यापारी मंडळाच्यावतीने शालिग्राम टिबडीवाल यांच्या उपस्थितीत या भागातील गेल्या पंधरा वर्षापासून व्यवसायिकांच्या दुकानासमोर चार चाकी गाडीवर भाजी किंवा फळ विक्री करणारे आहेत अशा 33 विक्रेत्यांची यादी तयार करण्यात आली. या विक्रेत्यांना नंबर दिला गेला. यावर पोलीस विभागाचा शिक्कासुद्धा मारण्यात आला.

    या दुकानदारांना आवटींत केलेल्या जागेवर दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त या भागामध्ये अन्य कोणत्याही व्यावसायिकाला दुकान लावण्याची परवानगी नसेल. त्यासाठी दररोज दोन पोलिसांची नियुक्त्ती सुद्धा करण्यात आली. या भागात त्यांच्याशिवाय इतर कोणीही दुकान लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, त्याचप्रमाणे यांचे साहित्य जप्त करण्यात येईल. इतर दुकानदारांना टिळक बाजार परिसरात किंवा ठाकरे मार्केट परिसरात व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी नगर परिषदेच्या वतीने निखिल लोहवे, गजानन पेटकर, शैलेश बिराजदार, अजिंक्य पाटील उपस्थित होते.