कृषी अधिकाऱ्याने बनविला ‘प्रकाश सापळा’; पतंगवर्गीय शत्रु कीडीवर येणार नियंत्रण

कृषी क्षेत्राची प्रगती झपाट्याने होत असताना नैसर्गिक आपत्तीबरोबर शत्रुकीड, खोडकीडा, गादमाशी, नवीन लष्करी अळींचा प्रादुर्भाव होत असल्याने भात पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कीड निर्मिती करणारा कीडीचे पंतग नष्ट करणे गरजेचे आहे. तेव्हा पतंगवर्गीय शत्रुकीडीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषी अधिकाऱ्याने प्रकाश सापळा बनविला आहे.

  देवरी (Devari).  कृषी क्षेत्राची प्रगती झपाट्याने होत असताना नैसर्गिक आपत्तीबरोबर शत्रुकीड, खोडकीडा, गादमाशी, नवीन लष्करी अळींचा प्रादुर्भाव होत असल्याने भात पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कीड निर्मिती करणारा कीडीचे पंतग नष्ट करणे गरजेचे आहे. तेव्हा पतंगवर्गीय शत्रुकीडीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषी अधिकाऱ्याने प्रकाश सापळा बनविला आहे. यातून पतंगवर्गीय शत्रुकीडीवर नियंत्रण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी मागील काही वर्षांपासून क्षेत्रिय पातळीवर कीडींच्या जीवनक्रमावर आभ्यास केला. त्यामध्ये असे दिसून आले की, आमावस्येच्या दिवसाच्या दरम्यान सायंकाळी 7 ते 9 वाजतादरम्यान नर मादींचे मिलन होऊन पिकावर मादी पतंग अंडी घालायला तयार होते. तद्नंतर अळी बाहेर येऊन नुकसान करते. पतंगाचे खुप निरीक्षण नोंदवल्यानंतर असे आढळले की कीडीचे पतंग हे आमावस्येच्या दरम्यान पुढे व मागे चार दिवस सायंकाळी दिव्यावर ठराविक वेळी मोठ्याप्रमाणात गोळा होतात. म्हणून ‘प्रित पतंगाची झड घाली ज्योतीवरी’ या उक्तीप्रमाणे शत्रुकीडींचे पतंग ज्योतीवर म्हणजे दिव्यावर प्रेम करतात. नरमादी पतंगाना धुंदी चढलेली असते. त्यावेळी मादी पतंग हे नर पतंगाना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कामगंध (फेरोमोन्स) स्त्राव हवेमध्ये सोडत असतात. त्यामुळे पतंगाचा मोठा जत्था गोळा होतो.

  जर त्यावेळी शेतामध्ये प्रकाश सापळा लावला तर मोठ्याप्रमाणात पतंग, गादमाशी इतर रस शोषणारे फुलकीडे, पांढरी माशी सापळ्यामध्ये अडकून मरतात, असे प्रयोगाअंती दिसून आले आहे. दरम्यान, आमावस्येच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीचा सुधारित सापळा मॉडेल विकसित करण्याचा कोळी यांचा मनोदय होता. 2010 वर्षी कराड येथे याची पहिली आवृत्ती प्रसारित केली. तद्नंतर आता गोंदिया जिल्ह्यामध्ये या प्रकाश सापळा तंत्रज्ञानाचे प्रसार करण्याची गरज भासली म्हणून हे मॉडेल विकसित केलेली आहे. याविभागात ‘प्रकाश सापळा’ हा एकमेव प्रभावी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही काळाची गरज बनलेली आहे. शेतकऱ्यांना वापरण्यासाठी चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यानी प्रकाश सापळ्याचे सुलभ मॉडेल विकसित केले आहे.

  आता प्रायोगिक तत्त्वावर हेमंत परशराम बागडेरिया यांच्या हरभरा व उन्हाळी भात पिकामध्ये आमावस्याच्या दिवशीपासून म्हणजेच 11 फेब्रुवारी 2021 रोजीपासून सदर सापळा लावण्यात आले आहे. प्रकाश सापळ्यात खुप प्रमाणात शत्रूकीडींचे म्हणजे खोडकीडीचे पतंग, गादमाशी, सुरळीतील अळीचे पतंग, फुलकिडे, पांढरी माशी हजारोंच्या संख्येने सापडलेले आहेत. कोळी यानी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहीती घेण्याचे विभागातील कृषिमित्र कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांचेमार्फत अवाहन केले आहे.

  प्रकाश सापळा लावण्याची पद्धत व वेळापत्रक
  प्रकाश सापळा हा पिकपेरणी/लावणी झाल्यावर आमावस्येच्या अगोदर तीन दिवस व आमावस्येच्या नंतर तीन दिवस लावावा. कारण कीडीची नर मादी पतंगावस्था तयार होऊन मिलनासाठी एकत्र येतात तसेच प्रकाशाकडे आकर्षित होतात व असंख्य पतंग हे प्रकाश सापळ्यात अडकून मरतात. त्यामुळे अंडीपुंज तयार करत नाहीत म्हणून अळी आवस्था तयार होतच नाही.