महेश ठाकूरला अटक करा; व्याघ्रप्रकल्पातील कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

दोन दिवसापूर्वी कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक व वनपरिक्षेत्र अधिका-यांना मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक न केल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी जिप्सी गाईड मालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले.

सेलू (Selu).  दोन दिवसापूर्वी कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक व वनपरिक्षेत्र अधिका-यांना मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक न केल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी जिप्सी गाईड मालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले.

सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प देशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. या पर्यटन भागांमध्ये 16 डिसेंबरला वर्धा रामनगर येथील महेश ठाकूर, सेलू येथील स्वप्निल तळवेकर, मंगेश रामटेके, जगदीश रोकडे, सुरेश चव्हाण व इतर तीन सहकारी जंगल सफारी करायला आले होते. बोर प्रकल्पातील तिकीट घर येथे कार्यरत असणारे वनरक्षकाला खासगी गाडी जंगल सफारीला घेऊन जाण्याची यांनी परवानगी मागितली. परंतु, प्रतिबंधित क्षेत्र असल्याने खासगी गाडीला या भागात परवानगी नाही हे सांगितल्यावर सुद्धा महेश ठाकूर व त्यांच्या सहका-यांनी भाकरे नामक रक्षकाला मारहाण व शिवीगाळ केली. तिकीट घराच्या बाजूला असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे भाकरे यांनी धाव घेतली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे यांची सुद्धा कॉलर पकडली. याबाबत सेलू पोलिस स्टेशनला दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अद्याप गुन्हेगारांना अटक न केल्यामुळे या भागातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक आणि जंगल सफारीकरिता काम करणारे सर्व चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तत्पूर्वी सेलू पोलिसांनी 353, 332,186, 294, 506, 504 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे, अशी माहिती तपास अधिकारी सुरेंद्र कोहळे यांनी नवराष्ट्रला दिली.

अटक होणार नाही तोपर्यंत काम बंद
सरकारी कर्मचारी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. याठिकाणी कुणालाही खासगी वाहन नेण्याची परवानगी नाही. कर्मचा-याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. पोलिस विभागाने या सराईत गुन्हेगारांना ताबडतोब अटक करावी. अन्यथा जोपर्यंत अटक होणार नाही. तोपर्यंत आमचे काम बंद आंदोलन सुरु राहील. पर्यटकांना होत असलेल्या गैरसोयींमुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
–नीलेश गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प, सेलू.