रानडुक्कराचा दोन शेतमजुरांवर हल्ला; भिष्णूर शिवारातील घटना, एक गंभीर जखमी

नजीकच्या चिस्तुर येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील धुऱ्यावरील झुडुपे तोडत असताना दोन शेतमजुरांवर रानडुक्कराने हल्ला केला. ही घटना नजीकच्या भिष्णूर फाट्याजवळील शिवारात गुरुवारी सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान घडली.

    तळेगांव (Talegaon).  नजीकच्या चिस्तुर येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील धुऱ्यावरील झुडुपे तोडत असताना दोन शेतमजुरांवर रानडुक्कराने हल्ला केला. ही घटना नजीकच्या भिष्णूर फाट्याजवळील शिवारात गुरुवारी सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान घडली.

    या हल्ल्यात एक शेतमजुर गंभीर जखमी झाला असून दुसरा सुदैवाने बचावला आहे. त्याला उपचारासाठी नागरिकांनी आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रानडुक्करांचा उपद्रव परिसरात मोठ्या प्रमाणात असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

    ज्ञानेश्वर पारिसे (वय 38) व मोतीराम पारिसे दोघेही रा. चिस्तुर हे शेतकरी विठ्ठलराव दहेकर यांच्या शेतात काम करण्याकरिता मजुरीने गेले होते. शेतात धुरे साफसफाई व झुडुपे तोडत असताना असताना सकाळच्या दरम्यान, त्यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर पारिसे हा गंभीर जखमी झाला असून उजव्या पायाला तीन ठिकाणी जबर दुखापत झाली आहे. तर मोतीराम पारीसे यांना धडक बसून ते खाली पडल्याने ते सुदैवाने बचावले. गंभीर जखमीला उपचारासाठी तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने शेतमालकाने आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

    परिसरातील शेतशिवारात रानडुक्करांचे वास्तव्य असून शेतातील उन्हाळी पिकावर ताव मारण्याकरिता येत असल्याने याचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या घटनेची तक्रार व माहिती वन विभागाकडे व तलाठ्याकडे देण्यात आल्याचे समजते. सध्यास्थितीत सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या संकटामध्ये वाढ होताना दिसत आहे. तेव्हा संबंधित विभागाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक पावले उचलून जखमी शेतमजुराला तत्काळ मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.